न्यू इंडिया को-ऑप. बँक घोटाळा; गुह्याची व्यापकता, आर्थिक परिणाम गंभीर; न्यायालयाने जामीन फेटाळला

कोटय़वधी रुपयांच्या न्यू इंडिया को-ऑप बँक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा देण्यास मुंबईच्या किल्ला कोर्टाने नकार दिला. गुह्याची व्यापकता व आर्थिक परिणाम गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. हितेश मेहता असे माजी व्यवस्थापकाचे नाव असून तो या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.

न्यू इंडिया बँक घोटाळय़ाच्या तपासादरम्यान आरबीआय अधिकाऱ्यांना 112 कोटी रुपयांची रोकड कमतरता आढळली. मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकेतील निधीचा अपहार केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्या अर्जावर दंडाधिकारी अभिजित सोलापुरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. आरोपीची जामिनावर सुटका झाली तर आरोपी पुराव्यांशी छेडछाड करेल व फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अडचणी निर्माण करेल असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तेव्हा न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावताना निरीक्षण नोंदवले की, आरोपपत्रानुसार अर्जदाराने रोख रक्कम घेऊन ती इतर आरोपींना हस्तांतरित करून चलनात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मेहता यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे रेकॉर्डवर आहेत तसेच या घोटाळय़ाचा आणखी तपास करण्यासाठी कागदपत्रांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.