
मर्यादित वेळेपेक्षा अधिक काम करणाऱया कामगारांना त्याचा मोबदला न देणाऱया कंपन्यांसाठी बॅड न्यूज आहे. नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे जास्त काम केले तरी कंपन्यांना ओव्हरटाइम द्यावा लागणार आहे. केंद्रीय कामगार मंत्रालय तसा नवा नियम बनवत आहे. तो येत्या एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने 29 कामगार कायद्यांमधील तरतुदी एकत्र करून कामगारांचे वेतन, आरोग्य व अन्य सुरक्षेबाबत संहिता तयार केल्या. त्या संहितांना गेल्या ऑक्टोबरमध्येच राष्ट्रपतींनी मान्यता दिली. मात्र कामगारहित लक्षात घेऊन त्यामध्येही काही सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. नव्या नियमांतर्गत केंद्रीय कामगार मंत्रालय एक वेब पोर्टलही तयार करत असून त्यावर कामगार आपली नोंदणी करू शकणार आहेत.
चार दिवसांच्या आठवडय़ाचीही तरतूद
नवीन कामगार नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना परदेशांप्रमाणेच चार दिवसांचा आठवडाही करता येणार आहे. पण त्यासाठी कामगारांना आठवडय़ातील 48 तास भरणे बंधनकारक राहील. म्हणजेच दिवसाला 12 तास डय़ुटी करावी लागेल.




























































