
नवे वर्ष 2026 आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलंय. नव्या वर्षात काही नवी आणि काही पुनरुज्जीवित नाटकं बहार उडवून देणार असं दिसतंय. सध्या रंगभूमीवर दणक्यात सुरू असलेल्या नाटकांच्या जोडीला तीन नव्या नाटकांचे शुभारंभ डिसेंबर महिन्यात होत आहेत. त्यात हमखास यशस्वी जोडय़ांसोबतच काही नवी समीकरणं पाहायला मिळणार आहेत.
भूमिका, प्रवेश क्रिएशन्स आणि अस्मय थिएटर्स निर्मित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटककार रत्नाकर मतकरी यांचं गाजलेलं नाटक रंगभूमीवर पुन्हा झळकणार आहे. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात जमलेली वैभव मांगले आणि भार्गवी चिरमुले यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय आणि त्यांच्या सोबत आहेत आनंद इंगळे. दिग्दर्शक आहेत, विजय केंकरे.
आचार्य अत्रे यांच्या मूळ नाटकांसारखीच त्यांची पुनःप्रदर्शित नाटके तितकीच गर्दी खेचतात असा अनुभव आहे. त्रैलोक्य, भूमिका आणि अथर्व निर्मित ‘भ्रमाचा भोपळा’ आचार्य अत्रे लिखित या नाटकाचा पुन्हा शुभारंभ होतोय. डॉ. श्वेता पेंडसे यांनी या नाटकाची नवी रंगावृत्ती तयार केली आहे आणि दिग्दर्शक आहेत पुनश्च विजय केंकरे. नाटकात सुनील तावडे, चेतना भट, शुभंकर तावडे आणि विनोदवीर संजय नार्वेकर आहेत.
डिसेंबरमध्ये शुभारंभ होणारे तिसरे नवे आणि महत्त्वाचे नाटक आहे ‘शंकर जयकिशन’. वेगळय़ा नावाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारे हे नाटक तरुण आणि आश्वासक लेखक विराजस कुलकर्णी आणि दिग्दर्शक सूरज पारसनीस या जोडगोळीने रंगभूमीवर आणलं आहे. भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे दोन सर्वस्वी भिन्न वाटेवरचे कलावंत या नाटकात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि त्यांच्या सोबत आहे शिवानी रांगोळे.



























































