देवदर्शनावरून परतताना भीषण अपघातात नववधुसह तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आखाडा बाळापूर

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर येथील विवाह आटोपुन देवदर्शनासाठी चंद्रपूर येथे जाऊन गावाकडे परत येत झालेल्या भीषण अपघातामध्ये नववधुसह तिघांचा मृत्यू झाला, तर नवरदेवासह पाच जण जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावजवळ ही घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता हा अपघात झाला.

आखाडा बाळापुर येथील देवीदास भरत उपरे (22) याचा विवाह 24 एप्रिल रोजी आखाडा बाळापुर येथील पोळा गणपती मंदिरात साक्षी (19) हिच्याशी संपन्न झाला होता. विवाह आटोपल्यावर उपरे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक चंद्रपुर येथील महाकाली देवीच्या दर्शनासाठी टाटा मॅक्स या वाहनाने गेले होते. चंद्रपूर येथील देवदर्शन आटोपुन आखाडा बाळापुर येथे परत येत असताना वाहनाचा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावजवळ मध्यरात्री 2 वाजता भीषण अपघात झाला. टाटा मॅक्सला ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत लक्ष्मीबाई भारत उपरे (40), सानिका किशन भोपाळे (14), नववधु साक्षी देविदास उपरे या तिघांचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई व सानिका या दोघी जागीच गतप्राण झाल्या. तर नववधु साक्षी उपरे हिला नागपूर येथे उपचारासाठी नेताना मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

hingoli

या भीषण अपघातामध्ये नवरदेव देवीदास उपरे, राजनंदिनी पवार (4), साधना कोंडबा गोंधरे (35), पुजा शंकर उपरे (20), चंपाबाई बाबा पेंडलेवार (70) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आले. या घटनेमुळे उपरे कुटूंबीय व आखाडा बाळापुरात शोककळा पसरली आहे.