
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ रेल्वे स्थानकावर मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने नवीन पादचारी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या पादचारी पुलाची लांबी 46 मीटर इतकी असून रुंदी 6 मीटर इतकी आहे. हा नवीन पादचारी पूल पूर्वेकडे असणाऱया पादचारी पुलाला आणि पश्चिमेकडील स्कायवॉकसह प्लॅटफॉर्म क्र.3/4 (डाऊन आणि अप धीम्या मार्गाला) एका तीन मीटर रुंदीच्या जिन्यासह जोडला जाणार आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात निर्मिती झालेला हा तिसरा पादचारी पुल आहे. पहिला पादचारी पूल वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यान तयार करण्यात आला होता. दुसरा पूल माहीम (उत्तर)मध्ये तयार करण्यात आलेला एमसीजीएम पादचारी पूल तर तिसरा पुल हा सांताक्रुझ येथील आहे. कोरोना काळातदेखील पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे सुरूच ठेवली आहेत. अन्य पादचारी आणि आरओबी तयार करण्याची कामेदेखील सुरू आहेत. नव्या पुलांमुळे ट्रेसपासिंग तसेच जीव धोक्यात घालून रूळ ओलांडण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच असामाजिक तत्त्वांवर अंकुश मिळवता येण्यास मदत होणार आहे.


























































