गर्दी कमी करण्यासाठी अंधेरी स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म

967

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ही गजबजलेले स्टेशन आहे. या स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे एक नवी प्लॅटफॉर्म बांधण्याच्या तयारीत आहे.  2014 साली मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरीत प्रवाशांची संख्या वाढली. वाढत्या प्रवाशांची संख्या पाहता त्यासाठी काही फुट ओव्हर ब्रिजही बांधण्यात येत आहे. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक 8-9 वर गर्दी वाढत असल्याने नवीन प्लॅटफॉर्मचा पर्याय पुढे आला आहे. 

अंधेरीत स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. 2014 साली घाटकोपर ते वर्सोवा अशी मेट्रो सेवा सुरू झाली. अंधेरी स्थानकावरून दररोज 7 लाख लोक प्रवास करतात तर अंधेरी मेट्रोवरून दररोज 2 लाख लोक प्रवास करतात. घाटकोपर मेट्रोतून दररोज दोन लाख 20 हजार लोक प्रवास करतात. अंधेरी भागात अनेक कंपन्यांनी ऑफिस थाटल्याने कर्मचारीवर्ग मोठ्या प्रमाणात येथे मेट्रोतून प्रवास करतो.

अंधेरीच्या फलाट क्रमांक 8 आणी 9 वरून विरार, वसईसाठी लोकल सुटतात. या फलाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडे दोन पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे फलाटाची जागा वाढवणे. परंतु यामुळे लोकलला येण्या जाण्यास अडचण वाढली असती. म्हणून अंधेरी स्थानकात अजून एक फलाट बांधण्याचा पर्याय पुढे आला. फलाट क्रमांक 6-7 वरही गर्दी असते. म्हणून इथल्या फलाटावरील स्टॉल हटवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

अंधेरी स्थानकातूनच हार्बर आणि मेट्रो जोडली आहे. अंधेरी स्थानकातून प्रवाशाला कुर्ला, वसई-विरार आणि घाटकोपरला जाण्यास सुलभ होते. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अनेकवेळा इथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते, त्यासाठी रेल्वे प्रशासनाने 30 रेल्वे पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच या स्थानाकावर दोन फुट ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. हे ब्रिज पुढील स्कायवॉकला जोडले जातील त्यामुळे रेल्वेस्थानकावरील गर्दी अजून कमी होण्यास मदत होईल. 

आपली प्रतिक्रिया द्या