ब्रिटनमध्ये फॅमिली व्हिसासाठी वेतन मर्यादेत वाढ

ब्रिटनचे नागरिक आणि निवासी कौटुंबिक व्हिसावर येणाऱया नातेवाईकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले. ब्रिटनमध्ये राहणाऱयांसाठी किमान उत्पन्न मर्यादा 55 टक्के वाढवण्यात आली असून यात ब्रिटनमध्ये राहणाऱया मूळच्या हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश आहे. ब्रिटन सरकारने गेल्या वर्षी या योजनेची घोषणा केली होती. याअंतर्गत कौटुंबिक व्हिसावर नातेवाईकांना ब्रिटनमध्ये बोलावणाऱया लोकांचे वार्षिक उत्पन्न 18 हजार 600 पाऊंडने वाढवून ते 29 हजार पाऊंड करण्यात आले आहे.

पुढील वर्षांपर्यंत ही वेतन मर्यादा दोन वेळा वाढवली जाणार आहे. 38 हजार 700 पाऊंडची कुशल कामगार व्हिसा वेतन मर्यादेबरोबर केली जाईल. ब्रिटनच्या गृह कार्यालयाने हे लीगल मायग्रेशनला कमी करणे आणि करदात्यांवर (टॅक्सपेयर) बाहेरून आलेल्या लोकांचे ओझे पडू नये, यासाठी हा बदल करण्यात आला आहे असे म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि गृहमंत्री क्लीवरली यांनी हे महत्त्वाचे बदल केले आहेत. ब्रिटनमध्ये मोठय़ा प्रमाणात बाहेरून लोक येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. कौटुंबिक व्हिसावर ब्रिटनमध्ये बोलावण्यासाठी वार्षिक उत्पन्नात 55 टक्के वाढ झाली आहे.