
एसआरए योजनेतील इमारतींचा ताबा दिल्यानंतर इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आतापर्यंत विकासकांवर केवळ तीन वर्षे होती. एसआरएच्या नव्या परित्रकानुसार, विकासकांना आता इमारतीची देखभाल-दुरुस्ती दहा वर्षे करावी लागणार आहे. एसआरएने दोषदायित्व कालावधी तीन वर्षांवरून वाढवून तो दहा वर्षे केला आहे. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला असून एसआरए इमारतींच्या निकृष्ट दर्जाच्या होणाऱया कामांना आळा बसणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन होत आहे. एसआरए इमारत रहिवाशांच्या ताब्यात दिल्यानंतर विकासक त्या इमारतीकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा लिफ्ट बंद पडणे, इमारतीला गळती लागणे असे प्रकार घडतात. दुरुस्तीसाठी रहिवाशांना वारंवार विकासकाकडे चकरा माराव्या लागतात. गोरेगावमधील जय भवानी इमारत आग दुर्घटनेपासून धडा घेत असे एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने अशा घटना रोखण्यासाठी काही शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार इमारतीचा ताबा दिल्यापासून पुढील दहा वर्षे इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आता विकासकावर असणार आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्ती, युद्ध आणि दंगलीमुळे झालेले नुकसान वॐगळता इतर सर्व प्रकारच्या नुकसानीची जबाबदारी विकासकाची असेल, असे एसआरएच्या परिपत्रकात नमूद आहे.




























































