आयटीसाठी लवकरच नवीन धोरण, सतेज पाटील यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि राज्यात आयटी उद्योगाला पाठबळ मिळण्यासाठी राज्य सरकार नवीन आयटी धोरण आखत आहे. या धोरणामुळे तंत्रज्ञानाधारित कंपन्यांना नवनवीन आविष्कार करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. नॅसकॉम आणि आयटी उद्योग क्षेत्रातील विविध संघटनांच्या सहकार्याने हे धोरण आखले जात आहे. या धोरणात विविध उपाययोजना, प्रोत्साहनपर योजना, करसवलती दिल्या जाणार असून त्याआधारे नागपूर, लातूर, नाशिक आणि संभाजीनगरसारख्या शहरांकडे आयटी, आयटीईएस आणि आयटी तंत्रज्ञानाधारित कंपन्यांना त्यांचे प्रकल्प उभारण्यासाठी आकर्षित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डिजीटेक कॉनक्लेव्ह 21 परिसंवादात बोलताना पाटील म्हणाले की, राज्यातील टियर-टू आणि टियर-थ्री शहरात आयटी उद्योग येण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करणार आहे. सध्या या कंपन्या मुंबई आणि पुण्यातच केंद्रित झालेल्या आहेत. परंतु नवीन धोरणात त्यांना योग्य अशा पायाभूत सुविधा, प्रोत्साहन, सवलती आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाचा पुरवठा करण्यावर आम्ही जोर दिलेला आहे. ग्रामीण भागात आयटी उद्योग आल्याने मुंबई, पुणे आणि ठाणे शहरांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईला जागतिक फिनटेक हब बनविले जाणार असून त्यासाठीसुद्धा धोरण आखले जात आहे. फिनटेक कंपन्या आणि स्टार्टअप मुंबईत उभे राहण्यासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ड्रोनसाठीही धोरण

आरोग्य, कृषी, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात ड्रोनच्या वापराबाबत राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणेच धोरण आखत आहे. कोविड नियमांची अंमलबजावणी, पुराची पाहणी, पाण्याचा निचरा यासारख्या उद्देशांसाठीही ड्रोनचा वापर करता आलेला आहे. मुंबईसारख्या शहरात पावसाळ्य़ात आपत्कालीन स्थितीत ड्रोनचा वापर करता येतो. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी मुंबईत सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर करता येणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.