
सामना प्रतिनिधी, मुंबई
बेस्टला नेहमीच सापत्न वागणूक देणाऱया पालिका प्रशासनाने एकदाचा आपला हात सैल केला आहे. रेल्वेप्रमाणेच बसगाडी किती मिनिटांत येईल हे कळणारे तंत्रज्ञान बेस्टमध्ये आणण्यासाठी पालिकेने पहिल्या टप्प्यात बेस्टला 3 कोटी देण्याचे ठरवले आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 110 कोटी असून महापालिका पूर्णपणे आर्थिक सहकार्य करणार आहे.
वाहतूक खोळंब्यामुळे बेस्टच्या गाडय़ा कधीच वेळेवर स्टॉपवर येऊ शकत नाही. बस किती वेळाने येणार हे माहीत नसल्यामुळे प्रवाशांचा वेळही वाया जातो. त्यामुळे गेल्या काही काळापासून बेस्टचे प्रवासीही घटू लागले आहेत. या प्रवाशांना पुन्हा बेस्टकडे वळविण्यासाठी बेस्टने ‘इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीमएमएस)यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेस्टच्या बससाठी स्टॉपवर ताटकळत राहिलेल्या प्रवाशांची प्रतीक्षा येत्या काही काळात संपणार आहे. स्टॉपवर बस किती वेळात येणार आहे याची अचूक माहिती देणारी नवीन ‘इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीएमएस) यंत्रणा बेस्टमध्ये येणार आहे. या नव्या अद्ययावत यंत्रणेमुळे ट्रेनप्रमाणेच बस नेमकी किती वेळात बसथांब्यावर येणार याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे या नव्या यंत्रणेसाठी संपूर्ण 110 कोटी रुपये खर्च पालिका देणार आहे.
हा फायदा होणार
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना नेमकी बस कोणत्या वेळेत येईल याची अचूक माहिती समजेल. या पद्धतीत आगार,गाडय़ांचा ताफा, कार्यशाळा आदींशी संबंधित गोष्टींचेही नियोजन केले जाणार आहे. फेऱयांचे नियोजन, वेळापत्रक, प्रवासी नोंदणी, वाय-फाय, सीसी टीव्ही, कर्मचाऱयांची उपस्थिती, आगारातून बस बाहेर पडण्याची-येण्याची वेळ, वेग, ठिकाण आदींची माहिती संग्रहित होणार आहे. बेस्ट व्यवस्थापनास नियोजनाच्या दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे. एखाद्या थांब्यावर प्रवाशांची जादा संख्या असल्यास तेथे जादा फेऱयाही पाठवणे शक्य होणार आहे.
पहिल्या टप्प्यात तीन कोटी
या अद्ययावत यंत्रणेची अंमलबजावणी बेस्ट उपकमात सुरु झाली आहे. यामध्ये बेस्टचे ट्रान्झिट ऑपरेशन, बेस्टची नामावली, रोस्टरिंग, नियोजन आणि अनुसूची, आगार आणि कार्यशाळा देखभाल, आदेश देणे आणि नियंत्रण कक्षाचे काम, मोबाईल ऍप इत्यादी वाहतूक विभागाशी संदर्भित सर्व कार्ये पार पडणार आहेत. त्यासाठी 110 कोटी 24 लाख इतका खर्च होणार आहे. हे काम प्रगतीपथावर असून क्वीन कॉर्पोरेशनतर्फे हे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बसमध्ये एलईडी डिसप्ले सिस्टम बसविणे, बसथांब्यांवर एलईडी सिस्टम बसविणे, बसगाडय़ांवर व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम बसविणे इत्यादी कामे सदर कंपनीतर्फे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांचे 3 कोटी 7 लाख देण्यात आले आहेत.





























































