
दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. दर्शन आयआयटीच्या हॉस्टेलमधील ज्या खोलीत राहत होता त्या खोलीत त्याने मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये ‘अरमान हॅज किल्ड मी’ असे लिहिले आहे. त्या चिठ्ठीतले अक्षर दर्शनचेच असल्याचे त्याच्या आईने ओळखले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पवई आयआयटीचा पहिल्या वर्षाचा दर्शन विद्यार्थी होता. त्याने 12 फेब्रुवारी रोजी हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र दर्शन आत्महत्या प्रकरणाने नंतर वेगळेच वळण घेतले होते. परिणामी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. ते पथक तपास करत असताना 3 मार्च रोजी हॉस्टेलमधील दर्शन राहत होता त्या 802 क्रमांकाच्या खोलीत टेबलाच्या खाली पडलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.
अरमानचे नाव का?
दर्शन हॉस्टेलमधील 802 क्रमांकाच्या खोलीत राहत होता. तर त्याच मजल्यावर अरमान 806 क्रमांकाच्या खोलीत राहतो. दोघेही पहिल्या वर्षाचे विद्यार्थी होते. दर्शनने त्याच्या मृत्यूला अरमानला जबाबदार धरले आहे. पण दोघांमध्ये असे काय घडले होते की त्यामुळे दर्शनने ऐवढी टोकाची भूमिका घेतली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र दर्शनने आत्महत्या करण्याच्या पाच सहा दिवसांआधी अरमान आणि त्याच्यात वाद झाले होते, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

























































