
नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त साईंच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी साईचरणी कोटय़वधींचे दान अर्पण केले आहे. सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शन मर्यादा असतानादेखील दहा दिवसांत तब्बल 6 कोटी 68 लाख रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.
दरवर्षी करोडो भाविक साई मंदिराला भेट देतात. त्यात अनेक साईभक्त साई संस्थानला विविध स्वरूपात भरभरून दान देतात. मात्र कोरोना संकट काळात मंदिर अनेक महिने बंद राहिल्याने दानाचा ओघ प्रचंड घटला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2021पासून साई मंदिर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात फक्त 25 हजार भाविकांना दर्शन व्यवस्था साई संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा हळूहळू दानाचा ओघ वाढत असल्याचे चित्र आहे.
24 नोव्हेंबर 2021 ते 4 जानेवारी 2022 या दहा दिवसांच्या नाताळ व नवीन वर्षाच्या सुट्टीच्या कालावधीत पुन्हा एकदा भक्तांनी साईंचरणी भरभरून दान केले. या दहा दिवसांत साई मंदिराच्या दान पेटीत तब्बल 6 कोटी 68 लाख रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. ज्यात 26 लाख 22 हजार रुपयांचे सोने तर 1 लाख 07 हजार रुपये किमतीच्या चांदीचा समावेश आहे. तर देणगी काउंटर व ऑनलाईन देणगीची माहिती अद्याप मिळू शकली नाही. त्यामुळे हा दानाचा आकडा आणखी वाढणार आहे. दर्शनाची मर्यादा असताना कोरोना काळात हे विक्रमी दान असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थ आणि व्यावसायिकांची कोरोना चाचणी
नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत लाखो साईभक्तांनी हजेरी लावत साई दर्शन घेतले. या काळात देशभरातून आलेल्या भक्तांमुळे कोरोनाचा धोका ओळखून शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांसह व्यावसायिकांची मंगळवारपासून कोरोना चाचणी सुरू झाली आले. सदरची मोहीम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले. तर नगरपंचायतीने सुरू केलेल्या या माहिमेचे सर्व व्यावसायिकांनी स्वागत केले असून यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.



























































