आरोग्य – निरोगी पचनतंत्रासाठी हे करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या व्यक्तीचे आरोग्य हे आतडय़ाच्या आरोग्याशी निगडित आहे. आतडय़ांचे आरोग्य निरोगी नसल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. म्हणूनच आपल्या पोटाला चांगल्या सवयी लावणे ही काळाची गरज ठरतेय.

पार्टीच्या नावाखाली पंचपक्वान्नावर मारलेला ताव आरोग्यासाठी घातक ठरतो. म्हणून नव्या वर्षाच्या आगमनाची तयारी करण्यापूर्वी आपल्या निरोगी पचनसंस्थेकरिता नक्की प्रयत्न करा, जेणेकरून ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता आणि ऑसिडिटी यांसारख्या विविध समस्या टाळण्यास मदत होईल. आतडय़ांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही या नवीन वर्षात काय करू शकता, याविषयी या लेखात माहिती दिली आहे.

हायड्रेटेड राहा – पुरेसे पाणी प्या, जे तुम्हाला पचनाला मदत करेल. तसेच पुरेसे पाणी प्यायल्याने आतडय़ांच्या हालचालींचे नियमन होऊन बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. दररोज किमान 10-12 ग्लास पाणी पिऊ शकता. पाण्यासोबतच लिंबू पाणी, नारळ पाणी यांचाही समावेश करू शकता. प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवायला विसरू नका.

फायबरयुक्त आहार घ्या – पचनसंस्था निरोगी आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही उच्च फायबरयुक्त आहाराची निवड करणे अत्यावश्यक असते. आहारात भरपूर ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कडधान्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. उच्च फायबरयुक्त नाश्त्याने तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. यामध्ये फळे, सुकामेवा, धान्याचा कोंडा, तृणधान्ये तुम्हाला पुरेशी ऊर्जा देतात.

प्रोबायोटिक्स आणि आंबवलेले अन्नपदार्थ खा – तुम्हाला माहिती आहे का, प्रोबायोटिक्स आणि आंबलेल्या अन्नामध्ये आतडय़ाला अनुकूल बॅक्टेरिया असतात जे तुम्हाला आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यांसारख्या विविध आरोग्य समस्यांपासून दूर ठेवू शकतात.

न चुकता दररोज व्यायाम करा -तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दररोज व्यायाम करणे आतडय़ांसाठी फायदेशीर आहे. नियमित शारीरिक हालचालींमुळे तुमच्या जीआय ट्रक्टमधील संसर्गास प्रतिबंध करू शकता.

कार्बोनेटेड पेयांपासून दूर राहा -उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप, कृत्रिम साखर, कार्बोनेशन, पॅफीन आणि शर्करायुक्त पेय हे अतिपॅलरीजने भरलेले असून पचनसंस्थेवर परिणाम करतात. कोर्बोनेटेड पेय तसेच मिठाई शक्यतो टाळावीच.

अन्न चावून खाणे – अनेक व्यक्ती अन्न नीट चावून खात नाहीत आणि नंतर हायपर ऑसिडिटीचा सामना करतात. अन्न योग्यरीत्या चावणे तसेच घाईघाईत न जेवता सावकाश जेवल्याने पोटाचा त्रास होत नाही.

अल्कोहोलचे सेवन टाळा – अल्कोहोलमुळे पचनतंत्रात व्यत्यय येऊ शकतो. अल्कोहोलचे सेवन टाळल्याने यकृत तसेच आतडय़ांचे आरोग्य सुधारते.

डॉ. रॉय पाटणकर (लेखक चेंबूर येथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आहेत)