न्यूझीलंडचा इंग्लंडमध्ये मालिका विजय, आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर झेप

टॉम लॅथमच्या नेतृत्वात न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने रविवारी बर्मिंगहॅम येथील कसोटीत इंग्लंडला 8 गडी राखून धूळ चारली आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने खिशात घातली. न्यूझीलंडने 1999 सालानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची करामत करून दाखवली हे विशेष. या कसोटीत सहा बळी टिपणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री सामनावीर ठरला. न्यूझीलंडच्या डेवोन कॉनवेने एक शतक व एक अर्धशतकासह या मालिकेत 306 धावांचा पाऊस पाडला. तसेच इंग्लंडचा रोरी बर्न्स याने 238 धावा फटकावल्या. दोघांची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. 18 जूनपासून साऊथम्पटन येथे हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी न्यूझीलंडने या मालिका विजयासह आत्मविश्वास संपादन केला आहे.

न्यूझीलंडने चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावांत गुंडाळला. मॅट हेन्रीने पहिल्याप्रमाणे दुसऱया डावातही तीन फलंदाज बाद केले. डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने 18 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ट्रेण्ट बोल्ट व एजाज पटेल यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. अवघ्या 38 धावांचा पाठलाग करणाऱया न्यूझीलंडने दोन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. टॉम लॅथमने नाबाद 23 धावांची खेळी साकारली. न्यूझीलंडने या मालिका विजयासह आयसीसी कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानला खाली खेचत पहिल्या स्थानावर झेप घेतली.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड – पहिला डाव सर्व बाद 303 धावा
न्यूझीलंड – पहिला डाव सर्व बाद 388 धावा
इंग्लंड – दुसरा डाव सर्व बाद 122 धावा
न्यूझीलंड – दुसरा डाव 2 बाद 41 धावा

आयसीसी कसोटी रँकिंग
(अक्वल पाच संघ)
 न्यूझीलंड – 123 रेटिंग
 हिंदुस्थान – 121 रेटिंग
 ऑस्ट्रेलिया – 108 रेटिंग
 इंग्लंड – 107 रेटिंग
 पाकिस्तान – 94 रेटिंग

आपली प्रतिक्रिया द्या