न्यूझीलंडकडून हिंदुस्थानला पराभवाचा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ,मुंबई

न्युझीलंड संघाने हीरो इंटरकॉण्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवताना यजमान हिंदुस्थानला २-१ असे पराभूत केले. यजमान संघातील सात बदलांचा लाभ किवींनी उठवला; पण मोठय़ा गोलफरकाने सलग दोन सामने जिंकणाऱ्या हिंदुस्थानने आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. यजमान संघासमोर जेतेपदाच्या लढतीत कोणत्या संघाचे आव्हान असेल याचे उत्तर उद्या केनिया-चीन तैपई यांच्यामध्ये होणाऱ्या लढतीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

मध्यंतरानंतर कर्णधार सुनील छेत्रीने किवींच्या गोलवर हल्ला चढवत हिंदुस्थानला १-० असे पुढे नेले; पण यजमानांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. न्यूझीलंडच्या डी. जॉन्गने ४८व्या मिनिटाला गोल करीत न्यूझीलंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ८५व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या मोझेस डायरने अफलातून गोल करीत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

स्टेडियममध्ये घोषणांच्या सरी

मुंबईत पहाटेपासून कोसळणारा पाऊस संध्याकाळी थांबला. त्यामुळे आपल्या संघाची पाठराखण करण्यासाठीहजारोंच्या संख्येने फुटबॉलशौकीन स्टेडियममध्ये उपस्थित होते. ‘जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा ,वंदे मातरम आणि माँ तुझे सलाम अशा घोषणांच्या सरींनी स्टेडियम चिंब होत होते.