
सामना ऑनलाईन । कुरुक्षेत्र
लग्नाच्या पहिल्या रात्री एका तरुणीवर तिच्या नवऱ्यासहीत घरातील सर्व पुरुषांनी तसेच चार तांत्रिकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हरयाणातील कुरुक्षेत्र येथे घडली आहे. या चार तांत्रिकांनीच घरातील पुरुषांना महिलेवर बलात्कार करण्यास सांगितले होते. पीडित तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पीडित तरुणीचे १२ सप्टेंबर रोजी लग्न झाले होते. सर्व विधी पार पडल्यानंतर १३ सप्टेंबरला तरुणीला व तिच्या नवऱ्याला एका खोलीत पाठविण्यात आले. मात्र काही वेळाने त्या खोलीत तरुणीचा सासरा देखील आला व त्याने जबरदस्ती तरुणीला शीतपेय प्यायला दिले. त्यानंतर ती तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर रात्रभर त्या तरुणीच्या सासऱ्याने, नवऱ्याने, दिराने, नंणदेच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तरुणी तेथून पळून जाऊ लागली तेव्हा तिच्या सासू व नणंदेने तिला मारहाण करून खोलीत बंद केले. त्या रात्री तरुणीच्या सासरी येणाऱ्या चार तांत्रिकांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. गेल्या आठवड्यात घरात कुणी नाही हे बघून ती तरुणी तेथून पळून गेली व तिच्या माहेरी आली. तिने वडिलांना तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर वडिलांनी याप्रकरणी तिची सासरची मंडळी तसेच चार तांत्रिकांविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमागे काही तंत्रविद्या, काळ्या जादूचा संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
























































