थोडक्यात बातम्या – नागपाड्यात नागपंचमी उत्साहात साजरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील जुना नागपाडा व नवा नागपाडा परिसरात श्रावणीचा पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुर्मीळ योग जुळून आल्याने नागपंचमीचा उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबापुरीतील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या मूळ पुरुषाच्या नागाचे स्थान असलेल्या मंदिरात नागपंचमीनिमित्त परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिराचे विश्वस्त सदानंद पुंगळे, रवींद्र भोई, प्रकाश राणे, श्रीकृष्ण कदम आणि मनोहर धाडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. नवा नागपाडा येथील नागदेवतेचे मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी भाविकांसाठी खुले केले जाते. हे मंदिर विडी कामगारांचे कुलदैवत मानले जाते. दंगलीनंतर काही काळ या उत्सवाची परंपरा विस्कळीत झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत नागपंचमी उत्सवाने पुन्हा हळूहळू पूर्वीचे भक्तिमय स्वरूप प्राप्त केले आहे. यंदाही मंदिराचे दरवाजे खुले होताच भाविकांनी नागदेवतेचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.

माटुंग्यात शनिवारी मेघमल्हार रंगणार
मुंबई : स्वप्नील पंडित या हरहुन्नरी निर्मात्याने आपल्या कला प्रवासात मेघमल्हार आणि स्वरसा इव्हेंट्सतर्फे अनेक अविस्मरणीय संगीत मैफलींचे आयोजन केले. संगीतावरील प्रेम, दर्जेदार सादरीकरण आणि रसिकांशी असलेली बांधिलकी यामुळे मेघमल्हारने एक वेगळी ओळख निर्माण केली.

३५ हून अधिक वर्षांच्या या सांगीतिक प्रवासात विविध विषयांवरील कार्यक्रम, असंख्य गाजलेल्या संकल्पना आणि अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग लाभला, यानिमित्त ‘मेघमल्हार : एक स्वप्नील प्रवास’ हा विशेष कार्यक्रम शनिवार, २२ ऑगस्टला सायंकाळी ८.३० वाजता माटुंगा येथील यशवंतराव नाट्य मंदिर येथे होणार आहे. स्वप्नील यांनी साकारलेल्या असंख्य मैफलींमधील काही निवडक मराठी आणि हिंदी गाणी, विविध विषयांची रंगत यात असणार आहे. या विशेष कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

मोशीतील जमीन क्रांतीवीर चापेकर समितीला
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मौजे मोशी येथील १५ हेक्टर शासकीय जमीन चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर समिती संचालित क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जायकवाडी प्रकल्पासाठी ६ हजार ४७७ कोटी
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ च्या कामासाठी ६ हजार ४७७कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार आहे.

यूसीआय चॅम्पियनशिपचे यजमानपद पुण्याला
‘पुणे ग्रँड टूर- २००६’ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२’ चे यजमानपद पुण्याला मिळणार आहे. या स्पर्धा संयोजनासाठी राज्य शासनाने आज धोरणात्मक मान्यता दिली. ‘यूसीआय वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२’ च्या निमित्ताने आशियातील पहिले यजमानपद हिंदुस्थानकडे येणार आहे.