एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीत 6 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

एलन मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 55 टक्क्यांनी घट झाली असताना दुसरीकडे कंपनीने मोठ्या टाळेबंदीची घोषणा केली आहे. नोकर कपातचा हवाला देत टेस्ला 6000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार टेस्ला कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.

टेस्लाच्या शेअर पडल्यानंतर त्याचा परिणाम कंपनीचे मालक एलन मस्क यांच्या संपत्तीवर पाहायला मिळाला. संपत्तीत घट झाल्यानंतर सर्वात आधी श्रीमंताच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या एलन मस्क यांचा ताज हिरावला आणि त्यानंतर त्यांचा श्रीमंतांच्या यादीतील पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, त्यांच्या नेटवर्थमध्ये घट होऊन 166 अरब डॉलर झाली आहे. टेस्लाच्या तिमाही नफ्यात घट झाल्याचा अंदाज अनेक अहवालांमध्ये आधीच वर्तवला जात होता आणि त्याची घोषणा होण्यापूर्वी, टेस्लामध्ये मोठ्या टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. बिझनेस टुडेवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एलन मस्क यांनी 6 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यादी तयार केली असून त्याअंतर्गत टेस्लाच्या कॅलिफोर्निया युनिटमधील 3,332 कर्मचारी, तर टेक्सास युनिटमधील 2,688 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

अहवालानुसार, टेस्लामध्ये 14 जून 2024 पासून टाळेबंदीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मागणीत घट आणि मार्जिनमुळे इलेक्ट्रिक कार कंपनीने टाळेबंदीचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. कॉस्ट कटिंगसाठी नोकरीत कपात केल्याने टेस्लाच्या बफेलो, न्यूयॉर्क युनिटमध्ये काम करणाऱ्या 285 कर्मचाऱ्यांवरही परिणाम होईल. यूएस रेग्युलेटरी फाइलिंगनुसार, टेस्लामधील कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या वर्षी 2023 च्या अखेरीस 1,40,000 पेक्षा जास्त होती. तिमाही निकालांच्या घोषणेनंतर, टेस्लाने एक कॉन्फरन्स कॉल आयोजित केला होता. एएफपीच्या अहवालानुसार, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी वैभव तनेजा यांनी सांगितले की, नोकऱ्या कमी केल्याने टेस्लाच्या खर्चात दरवर्षी $1 बिलियनपेक्षा जास्त बचत होईल. 2025 च्या उत्तरार्धात उत्पादन सुरू होण्यापूर्वी टेस्ला नवीन मॉडेल्सच्या लॉन्चला गती देण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले.