यजमान न्यूझीलंडने शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-20 लढतीत वेस्ट इंडीजवर डकवर्थ-लुईस नियमानुसार 5 गडी राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 21 धावा देत 5 फलंदाज बाद करणाऱया लॉकी फर्ग्युसनची या लढतीत ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
वेस्ट इंडीजकडून न्यूझीलंडसमोर विजयासाठी 16 षटकांमध्ये 176 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मार्टिन गप्टील (5 धावा), टीम सेईफर्ट (17 धावा) या सलामीवीरांना ठसा उमटवता आला नाही. पण डेव्होन कeनवे (41 धावा), ग्लेन फिलिप्स (22 धावा) यांनी न्यूझीलंडच्या विजयाची आशा कायम ठेवली. तसेच जेम्स निशाम (नाबाद 48 धावा) व मिचेल सँटनर (नाबाद 31 धावा) यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.





























































