ग्लेन फिलिप्सने कसोटीत भरली रंगत

फिलिप्सने फोडून काढले

5 धावांवर नाबाद असलेल्या फिलिप्सने खेळ सुरू होताच कसलाही विचार न करता बांगलादेशी आक्रमणावर हल्ला चढवला. त्याने डॅरिल मिचेलसह 51 धावांची भागी रचली तर कायल जेमिसनसह 55 धावांची भर घालत संघाच्या धावसंख्येत 20 षटकांतच शंभर धावांची भर घातली. तळाच्या फलंदाजांकडून फारशी अपेक्षा न बाळगता फिलिप्सने स्ट्राइक आपल्याकडे ठेवला. त्याचा झंझावात पाहाता तो झुंजार शतक झळकवणार असे वाटत असताना तो 87 धावांवर बाद झाला. त्याने 60 धावा चौकार-षटकारानिशीच फोडून काढल्या. तो बाद होताच न्यूझीलंडचा डावही 180 धावांवर संपला. केवळ फिलिप्सने फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने अनपेक्षितपणे 8 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडने आज 24.3 षटकांच्या फलंदाजीत 125 धावा काढल्या.

5 बाद 46 अशा केविलवाण्या अवस्थेत असलेल्या न्यूझीलंडवर शंभरीतच बाद होण्याची नामुष्की असताना ग्लेन फिलिप्सने 72 चेंडूंत 4 षटकार आणि 9 चौकारांची आतषबाजी करत 87 धावांची अफलातून खेळी करत बांगलादेशविरुद्धच्या दुसऱया कसोटीत रंगत आणली. त्याच्या खेळीमुळे न्यूझीलंडने चक्क 8 धावांची छोटी का होईना आघाडी घेत सर्वबाद 180 धावा केल्या. त्यानंतर यजमानांचे 2 विकेट घेत सनसनाटी सुरुवात केली. पावसामुळे ढगाळ वातावरणात खेळल्या गेलेल्या या सामन्यात तिसऱया दिवशी केवळ 32.3 षटकांचाच खेळ होऊ शकला. बांगलादेशची 2 बाद 38 अशी अवस्था असताना खेळ थांबविण्यात आला.

पावसाची संततधार गोलंदाजी सुरू असल्यामुळे गेल्या तीन दिवसांत केवळ 111.3 षटकांचाच खेळ होऊ शकला. दुसऱया दिवशी एकही चेंडू टाकता आला नव्हता. पावसामुळे आज उपाहारानंतर न्यूझीलंड मैदानात उतरला आणि फिलिप्सच्या झंझावाताचा बांगलादेशला फटका बसला.