मुंबईत आज मुसळधार! ऑरेंज अलर्ट जारी; पुढील दोन दिवसही जोरदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दोन दिवसांपासून काहीशी विश्रांती घेणारा पाऊस उद्या 5 जुलै रोजी मात्र मुसळधार बरसणार आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून मुंबईला ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवसही जोरदार पावसाचा अंदाज असल्याने हवामान खात्याने ‘यलो’ अलर्ट दिला आहे.

मुंबईसह राज्यातील कोकण विभागातही जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामध्ये 5 जुलै रोजी काही भागात अतिमुसळधार तर 6 आणि 7 जुलै रोजीदेखील जोरदार पावसाचा इशारा असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या काही भागात आजही जोरदार पाऊस झाला. शीव स्टेशन रोड परिसरात रस्ता क्र. 24 वर पाणी जमा झाल्यामुळे बस क्र. 7 मर्या., सी. 10, 22 मर्या., 25 मर्या., सी. 302, 312, 411 या गाडय़ांचा मार्ग सायंकाळी 5.45 वाजल्यापासून शीव सर्कलमार्गे वळवण्यात आला.

पडझड सुरूच

मुंबईत आज मुसळधार पाऊस झाला नसला तरी वाऱ्यासह पडलेल्या जोरदार सरींमुळे पाच ठिकाणी झाडे-फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. पूर्व उपनगरात एका ठिकाणी घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. तर तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यात कुणीही जखमी झाले नाही.

असा झाला पाऊस

मुंबई शहर 30.94 मिमी

पूर्व उपनगर      10.38 मिमी

पश्चिम उपनगर  14.83 मिमी