
अंबानींच्या ‘अॅण्टेलिया’समोरील सीसीटीव्हीतील पीपीई किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझेच होती. शिवाय इनोव्हाही तेच चालवत होते, असे ‘एनआयए’ने आज सांगितले. दरम्यान, स्कॉर्पियो प्रकरणात एनआयएच्या हाती ज्या तांत्रिक बाबी लागल्या आहेत, त्याआधारे एनआयएचे पथक आज सचिन वाझे यांना वेगवेगळय़ा ठिकाणी घेऊन गेले आणि अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
एनआयएच्या पथकाने आज सचिन वाझे यांना सोबत घेऊन बाबुलनाथ, गावदेवी, माहीम तसेच ठाण्यातील साकेत येथील घरी नेले. या ठिकाणी नेऊन एनआयएने घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींचे जबाब नोंदवून घेतल्याचे सांगण्यात आले. याशिवाय एपीआय रियाज काझी आणि प्रकाश होवाल यांची आज पुन्हा चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सायंकाळी त्यांना सोडण्यात आले. वाझे हे आणखी कोणती गाडी वापरत होते का याचाही एनआयए शोध घेणार आहे. दरम्यान, एटीएसने मनसुख याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱया डॉक्टर्स यांचाही जबाब नोंदविला आहे.
मनसुखचा डायटॉम रिपोर्ट आला
मनसुख हिरेन यांचा डायटॉम रिपोर्ट आल्याची माहिती सूत्रांनी दिली. डायटॉम रिपोर्टमध्ये मनसुख याच्या फुप्फुसात पाणी सापडल्याचे म्हटले आहे.
वाझे कुटुंबीयांची आठ तास चौकशी
वाझे यांच्या घरी दुपारी 2 वाजता आलेली एनआयएच्या टीमने वाझे कुटुंबीयांची कसून चौकशी केली. रात्री उशिरा पर्यंत तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. दरम्यान अटकेतील सचिन वाझे याना एनआयएच्या टीमने संध्याकाळी 8.30च्या सुमारास ठाण्याच्या साकेत येथील घरी आणले.

































































