महाराष्ट्रासह आठ राज्यांत एनआयएची छापेमारी, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय; इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अनेक कागदपत्रे जप्त

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाला अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कारवाई तीव्र केली आहे. याच मोहिमेंतर्गत एनआयएने महाराष्ट्रासह आठ राज्यांत ठिकठिकाणी छापे टाकले. छापेमारीत मोबाईल, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह मोठय़ा प्रमाणावर कागदपत्रे जप्त करून हेरगिरीचा कसून तपास केला जात आहे.

महाराष्ट्रात मुंबई तसेच दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम व पश्चिम बंगालमध्ये एनआयएने छापेमारी केली. पाकिस्तान इंटेलिजेन्स ऑपरेटिव्हशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. हिंदुस्थानविरोधी दहशतवादी कटाचा भाग म्हणून पाकिस्तानातील सूत्रधारांकडून हेरगिरीचे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आहे. त्याच अनुषंगाने संशयितांची कसून चौकशी सुरू असल्याचे एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले. सीआरपीएफचा निलंबित सहाय्यक उपनिरीक्षक मोती राम जाटला अलीकडेच अटक करण्यात आली. त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एनआयएने त्याच्याविरुद्ध 20 मे रोजी गुन्हा दाखल केला. त्यानंतर एनआयएने देशभरात छापेमारीची मोहिम राबवली. भारतीय न्याय संहिता, अधिकृत गुपिते कायदा आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांखाली दाखल केलेल्या प्रकरणांचा एनआयएमार्फत कसून तपास केला जात आहे.