
चर्चगेट येथील टाटा गार्डन येथे झोपलेल्या नागरिकांवर चाकूने हल्ला करणाऱया नायजेरियनला अखेर आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. जॉन केमखू असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी दुपारी जॉन हा एका महिलेसोबत टाटा गार्डन येथे बसला होता. त्याने दुपारी ड्रग्जची नशा केली होती. नशेत असतानाच जॉनचा एका महिलेसोबत वाद झाला. वाद झाल्यावर जॉनने टाटा गार्डनमध्ये झोपलेल्या सात जणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जॉनदेखील किरकोळ जखमी झाला होता. या घटनेची माहिती समजताच आझाद मैदान पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी जखमींना जे. जे. आणि जी. टी. रुग्णालयात दाखल केले. हल्लाप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी जॉनला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नेमका कोणत्या कारणावरून त्याने हल्ला केला हे जॉनने पोलिसांना सांगितले नाही.

































































