नायजेरियन ड्रग्जमाफियांचा आणखी एक साथीदार जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

परदेशात कोकेनचा साठा पाठविणाऱ्या टोळीचा नशेचा बाजार उद्ध्वस्त करणाऱ्य़ा अंबोली पोलिसांनी त्या टोळीच्या आणखी एका माफियाला बेड्या ठोकल्या आहेत. आफ्रिकेत पाठविलेला ड्रग्जचा साठा कुठपर्यंत पोहचला याची चौकशी करायला कुलाबा येथे गेलेल्या त्या माफियाच्या पोलीस निरीक्षक दया नायक यांनी तेथेच मुसक्या आवळल्या. नोन्सो इक्बोऐजे (35) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे सहा पासपोर्ट सापडले आहेत.

आंतरराष्ट्रीय टोळीचे काहीजण घरात वापरल्या जाणाऱया पडद्यामधून कोकेनची तस्करी करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. त्यानंतर दया नायक, एपीआय विशाल गायकवाड, उपनिरीक्षक विजय गायकवाड व पथकाने त्या टोळीला जेरबंद करून तब्बल 38 कोटी 95 लाख 97 हजार 600 रुपयांचे कोकेन जप्त केले होते. ही कारवाई केल्यानंतर दया नायक यांनी या ड्रग्जमाफियांच्या अन्य सहाकाऱयांचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, त्यांचा एक साथीदार नोन्सो इक्बोऐज हा कुलाबा येथे एका कुरीयर कंपनीकडे येणार असल्याची खबर दया नायक यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कुलाबा परिसरात सापळा रचून नोन्सो तेथे येताच त्याच्यावर झडप घातली. तेव्हा त्याच्याकडे दुसऱयांच्याच नावांचे पण नायजेरियन नागरिकांच्या नावे असलेले सहा पासपोर्ट मिळाले. त्यात एकाही आरोपीचा पासपोर्ट नव्हता. दुसऱयांच्याच नावाने असलेले पासपोर्टचा वापर आरोपी ड्रग्जचा साठा परदेशात पाठविण्यासाठी कुरीयर कंपनीला दाखविण्यासाठी करत होते असे समोर आले आहे. शिवाय कोकेनची खरेदी-विक्री करण्यामध्ये नोन्सोचा मोठा हात असल्याचेदेखील निष्पन्न झाले आहे. ही नायजेरियन ड्रग्जमाफियांची टोळी दुसऱयांच्या नावाचे पासपोर्ट कोठून मिळवतात, यासाठी त्यांना कोण मदत करते, नोन्सो ड्रग्जची खरेदी-विक्री कशी करतो याचा तपास करीत असल्याचे अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी सांगितले.

पाठविलेल्या ड्रग्जची विचारपूस करायला आला

नोन्सोने सहा किलोचे पाकीट आफ्रिकेला कुरीयर केले होते. त्यात कोकेनचा साठा आहे. ते पाकीट कुठपर्यंत पोहचले याची चौकशी करायला नोन्सो कुलाब्यात गेला होता. पण तो कुलाब्यात जाणार असल्याची खबर दया नायक यांना आधीच मिळाली आणि नोन्सोचा खेळ खल्लास झाला.