अंबोलीत कोकेनसह नायजेरियन तरुणाला पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

जोगेश्वरी पश्चिमेकडील नॅशनल डेअरीच्या समोरील नाक्यावर कोकेनची डिलेव्हरी देण्यासाठी एक नायजेरियन तरुण सोमवारी रात्री आला होता. पण तो येणार असल्याची खबर आधीच मिळाल्यामुळे अंबोली पोलिसांनी तेथे सापळा रचला होता. त्यामुळे तब्बल 36 लाख 76 हजार किमतीचे कोकेन घेऊन आलेला नायजेरियन तरुण अलगद पोलिसांच्या जाळय़ात सापडला.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एक नायजेरियन तरुण लाखो रुपयांचा कोकेन साठा देण्यासाठी जोगेश्वरी पश्चिमेला येणार असल्याची खबर अंबोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सरगर, एपीआय दया नायक, उपनिरीक्षक सावंत, अंमलदार नादीर, बोमटे, चव्हाण, पवार, पाटील, राणे या पथकाने नॅशनल डेअरीसमोरील नाक्यावर सापळा रचला. फेमी ओल्युयंका ओपयेमी (29) हा नायजेरियन तरुण तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. ओपयेमीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 36 लाख 76 हजार किमतीचा 472 ग्रॅम कोकेनचा साठा सापडला. हा कोकेनचा साठा त्याने कुठून आणला होता तसेच तो कोणाला विकणार होता याचा आम्ही तपास करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी सांगितले.