
रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सर्वसामान्यांचे अत्यंत महत्त्वाचे असतात ते सुटले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार नीलम गोऱ्हे यांनी केले. राष्ट्रीय अस्मिताही तेवढीच महत्त्वाची असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काश्मीरमध्ये 370 वे कलम हटवले, आजपर्यंत एवढे मोठे धाडस कुणीही दाखवले नाही, ते त्यांनी करून दाखवले. राज्यामध्ये शिवसेना-भाजपच्या युतीने अनेक विकासकामे केली. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर राहील, ही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे आज अनेक प्रश्न सुटल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. अनेकजण युती तुटण्याची वाट पाहत होते. मात्र त्यांची अवस्था शिंपल्याचे तुटले, बोक्याचे फावले अशी झाली होती, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
नगरमधील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भिंगार येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युती होईल की नाही याबाबतच मोठी चर्चा सुरू होती, जागावाटपावरून सुद्धा चर्चा झाली शिवसेना लाचार झाली असे म्हटले जात होते. मात्र सत्तेत असतानाही शिवसेनेने विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीक विमा ,अंगणवाडी सेविकांचा विषय असे अनेक प्रश्न आग्रही भूमिका घेऊन मांडले. त्यामुळे शिवसेना लाचार झाली असे दिसत नाही. विरोधक केवळ युती तुटायची वाट बघत होते. युती तुटून आपले फावेल, असे त्यांना वाटत होते. अखेर युती झाली, काही जागांवर तडजोड करावी लागली. मात्र, समजूतदारपणा दाखवावा लागतो, असे त्या म्हणाल्या. मुंबईमध्ये 19 जागा शिवसेनेला तर 18 जागा भाजपला, कोल्हापूरमध्ये शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवावे. आम्ही युती केली आहे ही रस्सीखेच नसून तडजोड करून मार्ग काढला आहे, असे त्या म्हणाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र यावी अशी भूमिका मांडली. तीच भूमिका आज आपण कायम ठेवली आहे. रामदास आठवले यांना सन्मानाचे पद दिले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथे स्मारक व्हावे ही भूमिका शिवसेना भाजप सरकारने मांडली व ती पूर्णत्वाला नेली असेही त्या म्हणाल्या. रस्ते वीज, पाणी हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे याबद्दल कोणाचे दुमत नाही. मात्र, राष्ट्रीय अस्मितेचा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कश्मीरमधील 370 कलम काढून जे धाडस दाखवले, निर्णय घेतला आजपर्यंत कोणी घेतला नाही असा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळामध्ये अनेक आश्वासने दिली. मात्र त्याची पूर्तता कधी झाली नाही. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला. धनगर समाजाच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे ,हे फक्त युतीच्या काळामध्ये झाले असे त्या म्हणाल्या.
निवडणुका या अतिशय महत्त्वाच्या आहेत कोणीही गाफील राहता कामा नये. 2009 मध्ये जो दगाफटका झाला तो होता कामा नये त्यामुळे प्रत्येकाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या. नगर शहरातील प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. उद्याने, पूल ,पाणी हे सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तेसुद्धा प्राधान्याने सोडवणार आहे, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना पुन्हा याच मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. याआधी ज्यांनी प्रतिनिधित्व केले, त्यांनी कोणतीही विकासकामे केली नाही. त्यामुळे आता आपल्याला पुन्हा राठोड यांना निवडून देऊन शहराचा विकास पुणे, मुंबईच्या धर्तीवर करायचा आहे, असे त्या म्हणाल्या. नगरमध्ये सुरक्षेचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. तोसुद्धा प्रामुख्याने सोडावा लागणार आहे. नगरसारख्या ठिकाणी अनेक खोटे-नाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले जातात, या सर्व बाबी तपासल्या पाहिजेत व या प्रकरणाची चौकशी काही केल्या पाहिजेत अशी भूमिका गोरे यांनी यावेळी मांडली.शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तुम्ही दारामध्ये उभा होतात. मात्र, काम पाहूनच काम पाहूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देताना निर्णय घेतला आहे. त्यामुळे अभी दरवाजा बंद हो गया, आता प्रयत्नही करू नका, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर उमेदवार अनिल राठोड ,महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख अश्विनी मते, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम ,अंबादास पंधाडे ,भाजपाचे महेश नामदे ,आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, ह.भ.प. गंगाधर शास्त्री महाराज, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, स्मिता अष्टेकर, सुनील लाल बोंद्रे, दिगंबर गेंट्याळ, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.






























































