
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना होत असलेल्या त्रासाची चौकशी वरिष्ठ महिला सचिवांच्या माध्यमातून करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर डॉ. नीलम गोर्हे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर देवरे यांनी व्हॉट्सऍपद्वारे डॉ. गोर्हे यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या आधारे डॉ. नीलम गोर्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन या घटनेची वरिष्ठ महिला सचिवांमार्फत चौकशी करण्याची विनंती केली आहे. देवरे यांच्यासंदर्भात विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी सुरू असून, महसूल विभागानेही या घटनेत लक्ष घातल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले आहे. डॉ. गोर्हे यांनी जिल्हाधिकाऱयांशीही चर्चा केली आहे.


























































