
नीलेश कुलकर्णी ([email protected])
ओबीसी जनगणनेवरून बिहारमध्ये राजकीय घमासान घडण्याची चिन्हे आहेत. जातीनिहाय जनगणनेसाठी भाजप सुरुवातीपासूनच अनुपूल नाही, तर दुसरीकडे जातिनिहाय जनगणनेवरून नितीशबाबू व लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे बिहारमध्ये लवकरच नवे राजकीय समीकरण जन्माला येईल, असे बोलले जात आहे. तसे झाले तरी बिहारच्या विकासाचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. बिहारचे गाडे पुन्हा जातीपातीच्या दलदलीत फसेल हे दुर्दैव!
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असत नाही. कायमचे असतात ते फक्त हितसंबंध. या उक्तीला जागणाऱया घटना बिहारमध्ये घडत आहेत. एकमेकांचे राजकीय हाडवैरी असलेल्या नितीशपुमार व लालू यादवांमध्ये सध्या ‘राजकीय गुटर्गू’ सुरू आहे. नितीशबाबू तब्बल पाचव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांचे सरकार भाजपच्या राजकीय पुबडय़ांवर व मेहरबानीवर चालले आहे. त्यामुळे ‘या सत्तेत मन रमत नाही’, अशी नितीशबाबूंची अवस्था झाली आहे. त्यांना भाजपसोबत काडीमोड घ्यायचा आहे, मात्र पर्याय नसल्यामुळे त्यांचे सरकार टिकले आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यापासून लालू यादव सध्या फॉर्मात आहेत. दिल्लीत त्यांनी गाठीभेटींना सुरुवात केली आहे. नितीशपुमार व लालू यांच्यात ‘समेट’ घडवून आणण्यात एकेकाळी नितीशबाबूंचे राजकीय विरोधक असलेल्या उकेंद्र पुशवाह यांनी पुढाकार घेतला आहे. नितीशबाबूंनी लालूंपुढे दोस्तीचा हात पुढे केला आहे खरा, पण गोष्टी कशा पद्धतीने पूर्णत्वास जातील याबाबत साशंकता आहे. जातीनिहाय जनगणनेवरून लालूंच्या दोन्ही चिरंजीवांनी नितीशबाबूंची नुकतीच भेट घेतली. एरव्ही नितीशबाबूंवर सडपून टीका करणारे तेजस्वी सध्या शांत आहेत. विशेषतः चिराग पासवानांची सध्याची अवस्था पाहून तेजस्वी यांनी योग्य बोध घेतला असावा. बिहारात सध्या नितीशपुमार मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या हाती अधिकार नाहीत. अधिकाऱयांच्या नेमणुकांपासून इतर गोष्टीत भाजपचा बोलबाला आहे. नितीशबाबूंच्या तालावर नाचणाऱया सुशील मोदींना भाजपने राज्यसभेत पाठविल्यामुळे नितीशबाबू सरकारात एकाकी पडले आहेत. त्यामुळेच त्यांनी लालूंना नव्याने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर लालूंनी या रिक्वेस्टकडे पाहिले असले तरी अजून ती ‘अॅक्सेप्ट’ केलेली नाही.
जातीनिहाय जनगणना हा बिहारमध्ये प्रभावी राजकीय मुद्दा बनणार आहे. मुळात म्हणजे जनतेला जातीपातीच्या राजकारणात गुरफटून ठेवले की विकास वगैरे दाखवावा लागत नाही. त्याच सूत्रानुसार ‘जानवे तोडा जाती तोडा’, असा नारा देत जातीपातीविरहित ‘संपूर्ण क्रांती’चा नारा देणाऱया लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे हे दोन शिष्योत्तम ‘जाती’साठी एकत्र येतात का, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. बिहारमध्ये नितीशबाबूंनी लालूंसोबत ‘साथी हाथ बढाना’ म्हणत नवा संसार थाटला तर तो भाजपसाठी मोठा धक्का असेल. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रयोग यशस्वी ठरावा यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत. बिहारमध्ये काय घडते ते दिसेलच.
लालू-मुलायम गळाभेट
राजधानीतील लालू यादव व मुलायमसिंग यादव यांच्या गळाभेटीने एका चर्चेला पेव फुटले आहे. ही यादव मंडळी एकत्र आली की हमखास ‘तिसऱया आघाडी’ची चर्चा होते. लालू बऱयाच दिवसांनी तुरुंगातून बाहेर पडले. सार्वजनिक जीवनात अवतरले. त्यांना भेटण्यासाठी वयोवृद्ध मुलायमसिंग पोहोचले. जयप्रकाश नारायणांच्या चळवळीतून हे दोन्ही यादव पुढे आले. त्या त्या राज्यांचे नेते बनले तोपर्यंत त्यांच्यात एकोपा वगैरे होता. मात्र राष्ट्रीय राजकारणांच्या महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटल्यानंतर दोघांत बिनसायला सुरुवात झाली. इतके की, 1996 ला तिसऱया आघाडीचे सरकार सत्तेवर येत असताना ज्योती बसू किंवा मुलायमसिंग यादव हेच पंतप्रधान होतील, असे राजकीय वातावरण झाले होते. मात्र लालूंनी आपल्यापेक्षा दुसरा यादव नेता मोठा व्हायला नको या धूर्त हेतूने मुलायमसिंग यांचे पाय खेचले आणि पंतप्रधानपदाचा लाभ कोणाच्याही ध्यानीमनी नसताना कर्नाटकाच्या देवगौडांच्या नशिबी आला. त्यानंतर या दोन्ही यादवांमध्ये कमालीचे वितुष्ट आले. ते वैयक्तिक पातळीवरही आले, मात्र 2014 नंतर यमुनेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता या दोघांची राजकीय अस्तित्वासाठी धडपड आहे. शिवाय राष्ट्रीय राजकारणात 2024 मध्ये काहीतरी वेगळे घडेल या मोठय़ा ‘आशावादा’वर सध्या सगळेच पक्ष आहेत. त्या दृष्टीने प्रत्येकजण आपापल्या परीने हातपाय मारत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी यादवांमधली गळाभेट ही मुस्लिम-यादव समीकरण मजबूत करण्याच्या दृष्टीने सांकेतिक मानली जात आहे. लालू यादव आणि मुलायम यादव यांच्यातील गळाभेटीने परस्पर प्रेमभाव निर्माण झाला तर बरेच होईल, मात्र त्यामुळे तिसरी आघाडी ही पंतप्रधानपदासाठीच्या ‘उत्सुकांची यात्रा’ ठरू नये इतकेच.
चंद्रशेखर नेमके कोणाचे?
उत्तर प्रदेशची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी नवनवीन राजकीय समीकरणे उदयाला येत आहेत. भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांनी योगींच्या राज्यात अन्याय झाल्याची भावना असणाऱया दलित समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ब्राह्मण-दलित असा नेहमीचा सोशल इंजिनीअरिंगचा नारा दिल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यानंतर चंद्रशेखर यांनी स्थापन केलेल्या समाज पक्षाला वेगळे महत्त्व आहे. चंद्रशेखर यांनी गेल्या काही वर्षांपासून दलित समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. योगींचे राज्य ठापूरांचे आहे, असा आरोप करत चंद्रशेखर हे प्रचाराची राळ उडवीत आहेत. मात्र ही भाजप व चंद्रशेखर यांच्यातील ‘नुरा पुस्ती’ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. मायावतींची दलित व्होट बँक विभागली जावी यासाठी चंद्रशेखर यांच्या पक्षाला भाजप बळकटी देत असल्याचा आरोप दबक्या आवाजात केला जात आहे. ओवेसींचा एमआयएम भाजपला पडद्याआडून मदत करतो, असा आरोप नेहमी होतो. तसेच आरोप -प्रत्यारोप आता चंद्रशेखर यांच्याबाबतीत होताना दिसत आहेत. त्यामुळे चंद्रशेखर नेमके कोणाचे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. बसपाने निवडणूक स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे अजून स्पष्ट धोरण ठरलेले नाही. अशा स्थितीत समाजवादी पक्ष व चंद्रशेखर यांचा समाज पक्ष एकत्र आले तर दलित-मुस्लिम व्होट बँक मजबूत होऊन त्याचा अखिलेश यांना मोठा राजकीय फायदा होईल, असे निरीक्षण आहे. ही युती झाली तर चंद्रशेखर हे ओवेसी नाहीत हे सिद्ध होईल. अन्यथा या सगळ्या मतांच्या फाटाफुटीत भाजपचे फावण्याची शक्यता अधिक आहे.

























































