“माझ्या भावाने दिलेला नारळ खाऊन पुन्हा काय विचारतोस ?”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

” माझ्या भावाने दिलेला नारळ खाऊन पुन्हा काय विचारतोस ? “

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

शिर्डीचे साईबाबा यांचे प्रमुख शिष्य व विसाव्या शतकांतील सुप्रसिद्ध संत श्रीदासगणु महाराज एकदा राजमहेंद्रीच्या मुक्कामांत ( इ.स 1907) श्रीस्वामीमहाराजांच्या भेटीसाठी आले. थोडी कीर्तनसेवाही त्यांनी केली. शेवटी त्यांच्या महाराजांनी पुढील कार्यक्रमाची चौकशी केली तेव्हा आपण शिर्डीला सदगुरु साईबाबांच्या दर्शनाला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी स्वामीमहाराजांनी जवळचा एक नारळ ‘हा नारळ आमच्या बंधूना द्या ‘ असे म्हणून त्यांना दिला.

दासगणूमहाराजांनीलवकरच शिर्डीला प्रयाण केले. वाटेत कोपरगावं येथे सकाळच्या आन्हिकासाठी थांबले. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांच्या बरोबरच्या मंडळींना भुका लागल्या म्हणून त्यांनी सामानातला चिवडा काढला. पण तो फार तिखट होता. चिवड्यावर प्यायला पाणीही नव्हते. तेव्हा बरोबरचे सगळे नारळ त्यांनी फोडून खोबरे चिवड्यांत घालून पाणी पिऊन टाकले. दासगणुंचे आटोपल्यावर त्यांनीही चिवडा दिला व सर्वजण पुढे निघाले.

शिर्डीला येऊन पाहतात गर काय साईबाबांनी रुद्रावतार धारण केलेला. दासगणूच्याकडे पाठ फिरवून बाबा ” चोर तो चोर हरामखोर ” म्हणत आहेत. नेहमी दासगणू आले की, अत्यंत प्रसन्नतेने स्वागत करणारे बाबा आज इतके का कुद्ध झालेत? असा विचार करून दासगणुंनी नमस्कार केला व बाबांची वारंवार क्षमा मागून या क्रोधाचे कारण विचारले . “माझ्या भावाने दिलेला नारळ खाऊन पुन्हा काय विचारतोस? ” असे बाबांचे बोलणे ऐकल्यावर दासगणूंनी बरोबरच्या मंडळींकडे नारळाची चौकशी केली.

तेव्हा झाला प्रकार त्यांना समजला. बाबांचा राग पुढे शांत झालाच. आपले व श्री टेंबे स्वामीमहाराजांचे आंतरिक नाते प्रकट व्हावे म्हणूनच हे नाट्य त्यांनी दाखविले होते.