श्री वासुदेव स्वामींचे चरणतीर्थ घेऊनी व्याधी पूर्ण बरी होई

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“श्री वासुदेव स्वामींचे चरणतीर्थ घेऊनी व्याधी पूर्ण बरी होई ,
भिक्षान्नावरी दृष्टी पडू नये म्हणून स्वामींच्या चारही
बाजूसी ब्राह्मण धूतवस्त्र हाती धरुनी चालती “

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री स्वामी महाराज आषाढ शुद्ध द्वितीयेला निघून आषाढ शुद्ध चतुर्दशीला तंजावरला पोहोचले. श्री क्षेत्र तंजावर हे कावेरी नदीच्या तीरावर आहे. येथे कवरा नदी असे म्हणतात. तंजावरजवळ श्री विमलांबा देवीचे रम्य स्थानाजवळच संध्यामठ आहे. तेथेच श्री स्वामी महाराजांनी चातुर्मास करण्याचे ठरविले. चातुर्मासास सुरुवात झाल्याबरोबर देवांनी श्री स्वामी महाराजांना आज्ञा “समश्लोकी गुरुचरित्रावर चुर्णीका लिहावी!” त्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मवर्तास असताना ‘श्रीगुरुसंहिता’ म्हणजेच जे संस्कृत समश्लोकी श्रीगुरूचरित्र पूर्ण झाले होते. त्या ग्रंथावर चुर्णीका म्हणजे मूळ श्लोकात्मक ग्रंथाचा अध्यात्मक गोषवारा लिहिण्यास श्रीस्वामी महाराजांनी सुरुवात केली.

एके दिवशी दुपारीच एक दिगंबरा असलेले अत्यंत तेजस्वी असे साधेपुरुष श्री स्वामी महाराजांकडे आले होते. ते दोघे रात्रभर एकांतात बोलत होते. दुसऱ्या दिवशी ते निघून गेले. पुढे त्यांचा पत्ता लागला नाही. एक देशस्थ ब्राह्मण विधवा स्त्री दररोज श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत असे. तिला वीस वर्षे दमा व खोकला यांचा खूप त्रास होत होता. पण ती त्याबद्दल कधीच काही बोलली नाही. श्री स्वामी महाराजांबरोबर श्री गांडाबुवा होतेच. त्यांनी तिला श्री स्वामी महाराजांचा चरणतीर्थ दिले ते तिने प्राशन केले. मात्र तेथेच तिला खोकल्याची मोठी उबळ येऊन जोराची वांती झाली. तिच्या छातीतील सर्व कफ पडून गेला व ती दम्याच्या विकारातून पूर्ण बरी झाली

तंजावर जवळील उमरखेड येथे देवशंकर त्रिपाठी या नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ होते. त्यांचा धाकटा भाऊ श्री सुब्बाराव हा वाईट संगतीला लागला होता. तो घरातील पैसे वाटेल तसे खर्च करी. श्रीस्वामी महाराजांची कीर्ती ऐकून देवशंकर त्याच्या दर्शनाला आले व त्यांनी आपल्या भावाची सर्व हकीकत सांगून त्याच्या सुधारण्याचा उपाय विचारला. श्री स्वामी महाराजांनी त्यांना एक यंत्र तयार करून दिले. त्याची रोज पूजा करण्यास सांगितले. तसे करताच हळूहळू त्यांच्या भावाचे वर्तन सुधारले व तो श्री स्वामी महाराजांच्या निस्सीम भक्त बनला.

श्री स्वामी महाराजांच्या भिक्षान्नावर कोणाची दृष्टी पडू नये, म्हणून श्री स्वामी यासाठी निघाले की चार ब्राह्मण चारही बाजूला धूतवस्त्र हातात धरून चालत असत. त्यांना अन्नात तूप चालत नसे. पोटात तूप गेल्यास ते बाहेर पडून जाईपर्यंत त्यांना शौचास होत असे. त्यांचा आहार फक्त आठ ग्रास होता. तंजावर येथे अवधुतराव नागराज नावाचे त्यांचे एक निष्ठावंत त्यांच्या घरी श्रीस्वामी महाराज नित्य भिक्षेला जात असत. त्यांचे धाकटे बंधु श्री कुप्पूस्वामी हेही श्री स्वामी महाराजांचे नि:सीम भक्त होते.

एक दिवस श्री स्वामी महाराजांनी कल्पतरुचा अवतार धारण केला व श्री कुप्पूला म्हणाले “आज काय पाहिजे ते मागून घ्या तुमची ईच्छा पूर्ण होईल ” श्री कुप्पूस्वामी म्हणाले ‘ आपणास आमचे नेहमी स्मरण असावे’ यावर श्री स्वामी महाराज म्हणाले ” आमच्या पोटात कोणाकडचे एक शीत गेले तरी आम्ही त्यांना विसरत नाही. या वेळी तर संपूर्ण चातुर्मास तुमच्याकडे अन्न पोटात गेले आहे. आम्हांला तुमचे विस्मरण कसे होईल ?” श्री स्वामी महाराजांनी तथास्तु! म्हटले पुढे आयुष्यभर श्री स्वामी महाराजांचे दृष्टान्त होऊन त्यांना मार्गदर्शन होत असे.

आपली प्रतिक्रिया द्या