
सामना प्रतिनिधी । किल्लारी
किल्लारी येथे श्री निळकंठेश्वर यात्रा महोत्सवाला 27 तारखेपासून सुरूवात झाली. या महोत्सवात तेरणा काठ गजबजून गेला आहे. ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत निळकंठेश्वरची जुनी किल्लारी येथे प्रतीस्थापना करण्यात आली. दहा दिवसापर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रप्रदेशासह इतर भाविकांना वेध लागलेल्या निलकंठेश्वर यात्रा महोत्सवाला 27 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. सतत जलाम्रात वाहणारे भारतातील एकमेव ज्योतिर्लिंग म्हणून निलकंठेश्वराची ख्याती आहे. बारा ज्योतीर्लिंगापेक्षा वेगळे महत्त्व असलेले हे जाज्वल मंदिर आहे. अनेक भाविकांना त्यांचे श्रध्देचे फळ भेटले आहे त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. यात्रा महोत्सवाला राहटपाळणे, सर्कस दाखल झाले आहेत. याशिवाय अनेक मनोरंजक, स्टॉल दाखल झाले आहेत त्यामुळे मंदिर परिसर चैतन्यमय झाला आहे.
यात्रा कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी किल्लारी पाटी ते जुने गाव मार्गावर मोफत वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्नदानासाठी मोठी स्पर्धा होत आहे. किल्लारी व परिसरातील भाविकांबरोबर लातूर, पुणे, मुंबईहुन भाविकहीपुढे येत आहेत. निळकंठेश्वर मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई ही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या सोहळ्यासाठी अनेक भजनी मंडळी दूरवरून 10 दिवसाच्या मुक्कामाला येत आहेत. काकड आरती, कीर्तन, भजन, परिपाठ दैनंदिन कार्यक्रम या यात्रा कालावधीत पार पडणार आहेत. याशिवाय सामाजिक उपक्रम म्हणून नेत्र शिबीर, रक्तदान शिबीर, सर्व रोग तपासणी शिबीर असे विविध उपक्रम राबले जाणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निलकंठेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
































































