ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी विवाहितेकडून हुंड्याची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून 1 लाख रुपये घेऊन यावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला घरातून हाकलून देण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळकोट पोलीस ठाण्यात फिर्यादी गिताबाई विठ्ठल कापसे (रा. रेतू उमरगा) हिने तक्रार दाखल केली. गिताबाई यांचे लग्न 14 वर्षांपूर्वी विठ्ठल तुकाराम कापसे याच्यासोबत झाले. नवरा, सासू, सासरा, दीर, नणंद, नंदवाई यांनी केवळ 4 महिने चांगले नांदवले. नंतर माहेरवरून ट्रॅक्टर घेण्यासाठी 1 लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. गावातच माहेर असल्यामुळे गिताबाईंनी वडिलांना सांगितले असता वडिलांनी सासरच्या मंडळींना समजावून पाहिले. शेवटी गिताबाई यांना त्यांचा नवरा विठ्ठल तुकाराम कापसे, सासू गंगाबाई तुकाराम कापसे, दीर बालाजी तुकाराम कापसे, नणंद मिना बालाजी कल्याणकर, नणंदेचा नवरा बालाजी कल्याणकर, नणंद लाडूबाई तुकाराम बोमटे, तिचा नवरा तुकाराम बालाजी बोमटे (रा. हडोळती) बेबाबाई बालाजी सुकणीकर, बालाजी भागवत सुकणीकर (रा.सुकणी ता.उदगीर) यांनी संगनमत करून माहेराहून 1 लाख रुपये आणावेत म्हणून घरातून हाकलून लावले.

गिताबाई यांचे वडील आता हयात नाहीत. वडिलांकडे केवळ 2 एकर शेती होती. त्यात गिताबाई यांचे बंधूही मयत झाल्यामुळे माहेरचे कोणी पैसे देऊ शकत नाहीत, अशी विनवणी करूनही कापसे मंडळींनी गिताबाई यांना नांदवण्यास नकार दिला. या प्रकरणी पोलीसांनी गिताबाईंचा नवरा विठ्ठल तुकाराम कापसेसह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.