दर्शनासाठी भाविकांना क्यूआर कोड विकणाऱ्या नऊ जणांना बेडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना क्यूआर कोडची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या नऊ जणांना दादर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे मंदिर परिसरातील दुकानदार तसेच फुलविक्रेते असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठय़ा संख्येने भाविक येत असतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांकरिता ऑनलाइन क्यूआर कोड बुक करून दर्शनाची व्यवस्था केली आहे. मात्र मंदिर परिसरात क्यूआर कोडचा काळाबाजार होत असून भाविकांना चढय़ा भावाने क्यूआर कोड विकले जात असल्याच्या तक्रारी मंदिर प्रशासनाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत मंदिर न्यासाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा भगत यांनी याप्रकरणी दादर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही संशयितांचे मोबाईल चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. अखेर चौकशीत त्या संशयितांनी क्यूआर कोडचा गैरवापर केल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. हे सर्व मंदिर परिसरातील दुकानदार तसेच फुलविव्रेते आहेत. आरोपी प्रत्येक गुरुवारी त्यांच्या मोबाईलमध्ये एका आठवडय़ाचे क्यूआर कोड डाऊनलोड करायचे. जे भाविक क्यूआर कोडशिवाय मंदिरात दर्शनासाठी येत असत अशांना हेरून आरोपी त्यांना डाऊनलोड केलेले क्यूआर कोड वेगवेगळ्या किमतीला विकत होते असे तपासात समोर आले आहे.