पळून जाण्यापूर्वी नीरव मोदीने अलिबागच्या बंगल्यात केली होती जंगी पार्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पीएनबी प्रकरणात परदेशी पळून गेलेला हिरेव्यापारी नीरव मोदी याने पळून जाण्यापूर्वी जंगी पार्टी केल्याचं समोर आलं आहे. सक्तवसुली महासंचालनालय(ईडी)च्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही असेही नातेवाईक उपस्थित होते, ज्यांची नावंही घोटाळ्याशी जोडलेली आहेत, अशी माहिती ईडीने दिली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदी याने 2017च्या थर्टिफर्स्टची पार्टी करण्यासाठी आपल्या अनेक नातेवाईकांना अलिबाग येथील फार्महाऊसवर निमंत्रित केलं होतं. त्यानंतर त्याने 1 जानेवारी 2018च्या दुपारी फ्लाईट पकडली आणि थेट संयुक्त अरब अमिरात गाठलं. त्यावेळी त्याचे नातेवाईक इथेच होते. निरव पळून गेल्यानंतर काही दिवसांनी त्याचे नातेवाईकही पळून गेले. यात मोदीचे आई-वडील, भाऊ आणि नीरवची पत्नी यांचा समावेश आहे. मोदी याच्या अलिबाग येथील बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

किहीम समुद्रकिनारी नीरव मोदीचे 70 गुंठे जागेत जवळपास 30 हजार चौरस फुटांचे बंगल्याचे बांधकाम आहे. नीरव मोदी फरार घोषित झाल्यानंतर ही मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली होता. अलिबागमधील अनधिकृत बांधकामांसदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला फटकारले होते. हा बंगला महाराष्ट्र नगर विकास संरक्षण अधिनियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आला असल्याचा अहवाल देत त्यावर कारवाई करावी, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. परंतु ही मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असल्याने त्यासाठी त्यांची मान्यता हवी होती. याबाबत ईडीने निर्णय घ्यावा असंही न्यायालयाने सुचवलं होतं.

25 जानेवारीला बंगला पाडण्यास सुरुवात झाली. जेसीबी किंवा पोकलेनच्‍या सहाय्याने बंगला पाडणे सहज शक्‍य नाही हे लक्षात आल्‍यानंतर तोडकाम थांबवण्‍यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठातील अभियंत्‍यांनी या बंगल्‍याची चार तास पाहणी केली. त्‍यांनी हे बांधकाम जेसीबीच्‍या सहाय्याने तोडण्‍याऐवजी नियंत्रित स्‍फोट पदधतीचा अवलंब करावा, असा अभिप्राय दिला आहे. त्‍यानुसार आता नियंत्रित स्‍फोटाने हे बांधकाम तोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.