
सामना ऑनलाईन । लंडन
पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून पोबारा केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी हा लंडन येथे रूप पालटून मजेत राहत आहे. तिथे त्याने हिऱयांचा आपला व्यवसायही नव्याने सुरू केला आहे असे वृत्त एका बड्या ब्रिटिश वृत्तपत्राने दिले आहे.
मोदी याच्या अटकेसाठी ‘इंटरपोल’ने रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने आपला चेहरामोहरा बदलून टाकला आहे. तो 72 कोटी रुपयांच्या आलीशान फ्लॅटमध्ये दरमहा 15 लाख रुपये भाडे देऊन राहत आहे. ‘आस्ट्रीच हार्डड’ या कंपनीचे किमान 10 लाखांचे ‘जाकीट’ घालून फिरताना नीरव हा मिक ब्राऊन या पत्रकाराला आढळला, मात्र त्या पत्रकाराने प्रश्नांचा भडिमार करताच मोदीने टॅक्सी पकडून पळ काढला.
मोदी याने केलेला पीएनबी घोटाळा फेब्रुवारी 2018 मध्ये उजेडात आल. त्याची देशातील सारी बँक खाती तपास यंत्रणांनी गोठवली आहेत. तसेच त्याचा अलिबागच्या किहीम बीच येथील 30 हजार चौरस फुटांचा बंगला सरकारने स्फोटकांचा वापर करून नुकताच जमीनदोस्त केला आहे. मोदी याची 147.72 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
लंडन वेस्टएंडच्या सेंटर पॉइंट टॉवर ब्लॉक येथे बस्तान ठोकलेल्या नीरव मोदी याने ब्रिटनमध्ये वर्क ऍण्ड पेन्शन डिपार्टमेंटकडून नॅशनल इन्श्युरन्स नंबरही मिळविला आहे. याचा अर्थ तो यापुढे त्या देशात कायदेशीररीत्या व्यवसाय करायला मोकळा आहे. त्याने तिथे नवीन बँक अकाऊंटस् उघडून आपला हिऱयांचा व्यवसाय निर्विघ्नपणे सुरू केला आहे.































































