
हैदराबादमधील दिशा सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगाणा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. त्यानंतर निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फासावर लटकवा अशी मागणी होत आहे. याचपार्श्वभूमीवर तिहार जेलमध्ये तणावाचे वातावरण असून निर्भयाच्या दोषींची फाशीच्या भितीने झोप उडाली आहे.
निर्भयाच्या दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण ही शिक्षा केव्हा होणार हे सरकारने जाहीर केले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला गळा आवळून ठार करण्यात आले. नंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला. या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आणि निर्भयाच्या दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची मागणी झाली.
त्यानंतर निर्भयाच्या दोषींना ज्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथील हालचालींनाही वेग आला. हे लक्षात आल्यापासून अक्षय, मुकेश, विनय आणि पवन या निर्भयाच्या दोषींची झोपेबरोबरच भूकही उडाली आहे. संपूर्ण रात्र ते तळमळतच काढत असून उपाशी पोटी झोपत आहेत.
तर दोषींना फाशी देण्यासाठी बक्सर येथून दोरखंड मागवण्यात आल्याचे तिहार जेल अधिक्षकांनी सांगितले आहे. दरम्यान, दोषींना 16 डिसेंबर किंवा 29 डिसेंबरला फासावर लटकवणार असल्याचे बोलले जात नाही.



























































