
निर्भया बलात्कार प्रकरणातील आणखी एक दोषी नराधम पवन गुप्ता याने दिल्ली उच्च न्यायालयात आपण घटना घडली तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने आज गुरुवारी फेटाळून लावली. शिवाय न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या वकिलालाही 25 हजारांचा दंड ठोठावून चांगलाच दणका दिला. पवन गुप्ता याच्या वयासंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी संबंधित वकिलाविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिल्ली बार काऊन्सिलला दिले. या प्रकरणात न्यायालयाने 24 जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब ठेवली होती. परंतु, निर्भयाच्या आई-वडिलांनी याप्रकरणी गुरुवारीच सुनावणी घेण्याची मागणी केल्यामुळे या प्रकरणावर न्यायालयाने सुनावणी घेतली.
- निर्भयाच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फासावर लटकवा, त्यासाठी डेथ वॉरंट जारी करा, अशी मागणी करणारी याचिका पतियाळा हाऊस कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 7 जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, दोषींपैकी एक नराधम अक्षयकुमार सिंहची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.






























































