बक्सरच्या तुरुंगात फाशीच्या तयारीला वेग; दहा फास बनवण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2012 साली राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित निर्भयाला न्याय देण्यासाठी सरकारने अखेर फाशीच्या अंमलबजावणीला वेग दिला आहे. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी बक्सरच्या मध्यवर्ती तुरुंगात जोरदार तयारी सुरू झाली आहे. पुढील चार दिवसांत दहा फास बनवण्याचा आदेश तुरुंग महासंचालनालयाने बक्सर तुरुंग प्रशासनाला दिला आहे.

हैदराबादपाठोपाठ उन्नावमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनांमुळे निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीचा मुद्दा पुढे आला. फाशीची अंमलबजावणी होत नसल्यामुळेच अशा घटनांची पुनरावृत्ती होतेय असा नाराजीचा सूर संपूर्ण देशभरातून आळवला गेला. त्यावर सरकारने निर्भया प्रकरणातील दोषींना वेळीच फासावर लटकवण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते. फाशी देण्यासाठीचा मजबूत दोर देशात केवळ बक्सरच्या तुरुंगात बनवला जातो. या तुरुंगातील कार्यशाळेत सध्या सहा कैदी हा विशेष दोर बनवत आहेत. देशात ज्यावेळी फाशीचा आदेश जारी केला जातो, त्यावेळी बक्सर तुरुंगातीलच कैदी फाशीचा दोर बनवतात, असे तुरुंग अधीक्षक विजयकुमार अरोरा यांनी सांगितले.

चारही दोषींना तिहारमध्ये आणले

निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी तिघे आधीपासूनच तिहार तुरुंगात बंदिस्त आहेत. पवनकुमार गुप्ता याला मात्र मंडोली तुरुंगात ठेवण्यात आले होते. आता फाशीची तयारी सुरू झाल्याने त्यालाही मंडोलीतून तिहार तुरुंगात हलवण्यात आले आहे. त्याला क्रमांक दोनच्या तुरुंगात ठेवले आहे. या तुरुंगात मुकेश सिंग व अक्षयकुमार सिंग हे दोघेही बंदिस्त आहेत, तर विनय शर्मा याला क्रमांक चारच्या तुरुंगात ठेवले आहे.

  • बक्सर तुरुंग प्रशासनाने 1995 साली भागलपूर तुरुंग, 1981 साली महाराष्ट्र, 1990 साली पश्चिम बंगाल, 2003 मध्ये आंध्र प्रदेश, 2004 मध्ये पश्चिम बंगाल, 2012 मध्ये मुंबई आणि 2013 साली दिल्लीला फास पुरवला होता.
  • फाशीचा विशेष दोर पंजाबमधील रुईच्या सुतापासून तयार केला जातो. तब्बल 7200 धाग्यांपासून हा दोर बनवला जातो. दोर बनवल्यानंतर विशेष रॉडमध्ये 100 किलोचे वजन बांधून त्याची क्षमता तपासली जाते.
  • सध्या या दोराची किंमत 1725 रुपये आहे, परंतु कच्चा धाग्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच दोराचा वापर करण्यापूर्वी पितळचा खास लेप देण्यासाठीही जादा पैसे आकारले जाणार आहेत.
  • 1844 मध्ये इंग्रजी राज्यकर्त्यांनी बक्सर तुरुंगात फाशीचा दोर बनवण्याची फॅक्टरी सुरू केली होती. त्यावेळी दोर बनवण्यासाठी फिलिपाइन्सची राजधानी मनिलातून रुई मागवली जात होती.

प्रदूषणानेच मरतोय, फाशीची काय गरज?

दिल्लीतील हवा आणि पाणी इतके प्रदूषित आहे की या प्रदूषणाने आमचे आयुष्य कमी होत चाललेय. मग फाशी कशाला देताय, असा सवाल करीत अक्षय कुमार सिंग या दोषीने सर्वोच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने 5 मे 2017 रोजी फाशी सुनावत दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती अक्षय कुमारच्या वतीने वकील डॉ. ए. पी. सिंग यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रींनी अक्षय कुमारच्या याचिकेचा स्वीकार केला आहे. त्याची याचिका निकाली निघाल्यानंतर इतर तीन दोषी एकत्रितपणे क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार आहेत.