निर्भया प्रकरणात विनय शर्माची याचिका फेटाळली

861

ज्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठाण्यात आली आहे, त्याचे चिंताक्रांत होणे स्वाभाविक आहे. निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याच्यावर योग्य उपचार करण्यात येत आहेत, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.

निर्भया प्रकरणातील एक आरोपी विनय शर्मा याने आपल्याला स्किझोफ्रेनिया असून योग्य उपचार करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. आज शनिवारी या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी तिहार कारागृहाचे वकील इरफान अहमद यांनी विनयचा वैद्यकीय अहवाल न्यायालयाला सादर केला. विनयने कारागृहाच्या भिंतीवर डोके आपटले. त्यानंतर लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही न्यायालयाला दाखविण्यात आले. विनय मानसिक रोगी असल्याचा कोणताही जुना दाखला नाही. विशेष म्हणजे विनयने अलीकडेच आई व वकिलाला दोनदा फोन केला होता. असे असतानाही विनय आईला ओळखत नाही, असा दावा करणे योग्य नसल्याचे इरफान अहमद यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने विनय शर्माला कारागृहात देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधा पुरेशा आहेत. त्याला व्यवस्थित मनोवैज्ञानिक मदतही देण्यात आल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.

पवनचा वकिलाला भेटण्यास नकार

निर्भया प्रकरणातील दुसरा आरोपी पवन गुप्ता याने न्यायालयाने देऊ केलेले वकील रवी काजी यांना भेटण्यास नकार दिला. पवनने वकिलास भेटण्यास नकार दिल्यामुळे हे प्रकरण पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पवनकडे क्युरेटिव्ह पीटिशन व दया याचिका असे दोन पर्याय अजून उपलब्ध आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या