सरन्यायाधीश बोबडे यांची ’निर्भया’ खटल्यातून माघार, दुसऱ्या खंडपीठासमोर आज सुनावणी

सरन्यायाधीश शरद बोबडे हे निर्भया खटल्यातील दोषी आरोपी अक्षय याच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीमधून बाहेर पडले आहेत. आपल्याच एका नातेवाईकाने निर्भयाच्या आईच्या वतीने या खटल्यात बाजू मांडली होती. त्यामुळे अक्षयच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी दुसऱ्या खंडपीठासमोर करणे योग्य ठरेल असे न्या. बोबडे यांनी स्पष्ट केले आहे. आता या याचिकेवर नव्या खंडपीठासमोर बुधवारी सकाळी सुनावणी होणार आहे.

दोषी अक्षय याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा आधार देत त्याने त्या शिक्षेला आक्षेप घेतला आहे. प्रदूषणामुळे दिल्ली म्हणजे गॅस चेंबर बनले आहे. दिल्लीतील नागरिकांचे आयुष्यमान प्रदूषणामुळे कमी होत असताना मृत्युदंडाची शिक्षा का दिली जावी असे त्याने याचिकेत म्हटले आहे. तसेच फाशीपासून बचावासाठी त्याने सत्ययुग, कलियुग, महात्मा गांधी यांचा अहिंसेचा विचार आदी उदाहरणेही दिली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या