मुंबईतील निर्भया पथके हायटेक होणार; आता थेट मोबाईलवर संपर्क साधता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>आशीष बनसोडे

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस अधिक सक्षम पाऊल उचलणार आहेत. महिलांवर अन्याय, अत्याचार होऊ नये. शिवाय महिलांना वेळीच मदतीचा हात मिळावा यासाठी पोलीस दलातील निर्भया पथकांचे हात आता आणखी मजबूत केले जाणार आहेत. वेळ न दवडता झटपट कारवाई करता यावी याकरिता पोलीस ठाण्यातील निर्भया पथकांना मोबाईल देण्यात येणार आहेत.

महिला व बालकांसाठी सुरक्षित असलेली मुंबई आणखी सुरक्षित करण्यासाठी पोलीस दलाकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. शहरातील निर्भया पथके अधिक गतिशील व प्रभावी करण्यासाठी आता मोबाईलची साथ घेण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाला लवकरच एक मोबाईल देण्यात येणार आहे. मोबाईलमुळे या पथकाला अधिक गतीने काम करता येणार आहे. लवकरच निर्भया पथकांना अँड्रॉईड मोबाईल देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. मोबाईलमुळे संबंधितांना पोलिसांची वेळेवर मदत मिळवणे शक्य होणार आहेच, शिवाय निर्भया पथकाला कामचुकारपणा करता येणार नाही.  प्रत्येक कॉल आणि व्हॉट्सअप मेसेजची शाहनिशा करून कारवाई केली की नाही, किती वेळात आणि कशी मदत पथकाकडून देण्यात आली याचा वेळोवेळी वरिष्ठांकडून लेखाजोखा घेतला जाणार आहे. एंकदरीतच मोबाईल निर्भया पथक आणि महिला व बालकांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचेही अधिकाऱयाने सांगितले.

 काय होणार मोबाईलचा फायदा

  • मोबाईलचा नंबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रसिद्ध केला जाणार.
  • महिला, तरुणी, बालकांवर अन्याय, अत्याचार होत असल्यास थेट त्या नंबरवर संपर्क साधून तक्रार करून मदत मिळवता येणार.
  • मोबाईल नंबरवर व्हॉट्सअसदेखील असणार. त्यामुळे फोटो, व्हिडीओ किंवा अधिक माहिती संबंधितांना झटपट देता येणार आहे.

वेळ वाचणार, मदत द्यावी लागणार

पोलिसांशी संपर्क करायचा असल्यास निंयत्रण कक्षाला कॉल करून माहिती द्यावी लागते. मग नियंत्रण कक्षाकडून संबंधित पोलीस ठाण्याला सांगितले जाते. त्यानंतर निर्भया पथकाला सांगितल्यावर पोलीस घटनास्थळी रवाना होतात. यामध्ये नाही म्हटले तरी सुरुवातीचा निर्णायक वेळ वाया जातो. हाच वेळ कामी लावण्याचे काम मोबाईलमुळे शक्य होणार आहे. मोबाईलमुळे थेट निर्भया पथकालाच संपर्क साधला जाणार असल्याने वेळीच मदतीचा हात देणे पोलिसांना शक्य होणार आहे.