
बदलत्या जीवनशैलीमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे कार खरेदी करताना ग्राहक सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. अनेकदा कार खरेदी करताना गोंधळ उडतो. मात्र आता कार किती सुरक्षित आहे हे कळू शकणार आहे. कारण हिंदुस्थानातच वाहनांची क्रॅश टेस्ट केली जाणार असून सेफ्टी रेटिंगही दिली जाणार आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘भारत एनसीएपी’ अर्थात भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम लाँच करण्यात आला.
‘भारत एनसीएपी’ प्रोग्राम असणारा हिंदुस्थान हा आता पाचवा देश ठरला आहे. या प्रोग्रामअंतर्गगत हिंदुस्थानात तयार होणाऱया आणि विक्री होणाऱया गाडय़ांची क्रॅश टेस्टिंग करता येणार आहे. त्यानुसार सेफ्टी रेटिंग दिली जाणार आहे. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, आजचा दिवस हिंदुस्थानसाठी तसेच ऑटोमाबाईल उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘भारत एनसीएपी’ लाँच केल्यानंतर पहिल्या 30 गाडय़ांच्या मॉडेलची क्रॅश टेस्ट करण्यासाठी रिक्वेस्ट आली आहे. या प्रोग्राममुळे गाडय़ांमध्ये सेफ्टी फिचर्सची वाढ होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल, तसेच गाडय़ा अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपन्यांवरही दबाव राहील. विशेष म्हणजे कार क्रॅश टेस्टसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही, असेही गडकरी म्हणाले.
अपघातांमुळे जीडीपी घटला
रस्ते अपघातांमुळे देशाचा जीडीपी अर्थात दरडोई उत्पन्न घटल्याचेही गडकरी यांनी नमूद केले. रस्ते अपघातात जीव गमावणाऱयांमध्ये 18 ते 34 वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक समावेश असतो. हे लक्षात घेतले तर जीडीपीत 3.14 टक्क्यांचे नुकसान होत असल्याचे समोर आल्याचे ते म्हणाले.
दरवर्षी दीड लाख लोकांचा अपघाती मृत्यू
हिंदुस्थानात दरवर्षी तब्बल पाच लाख रस्ते अपघात होतात तर दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. रस्ते अपघात आणि वायुप्रदूषण या देशातील सर्वात मोठय़ा दोन समस्या असल्याचे ते म्हणाले. देशभरात दिवसाला 100 रस्ते अपघात होत असून यात 400 लोकांचा मृत्यू होतो तर दर तासाला 47 दुर्घटनांमध्ये 18 लोकांचा मृत्यू होतो, असेही गडकरी यांनी सांगितले.
कसे काम होणार?
1 ऑक्टोबर 2023 पासून ‘भारत एनसीएपी’ देशभरात लागू होणार.
गाडय़ांना त्यांच्या सुरक्षा फिचर्सनुसार 0 ते 5 रेटिंग दिले जाते.
या प्रोग्रामअंतर्गत ऍडल्ट आणि चाईल्ड सुरक्षा रेटिंग दिले जाईल.
प्रत्येक स्तरावरील चाचणीसाठी रेटिंग दिले जाईल. त्यामुळे कारचे आणि प्रवाशांचे किती नुकसान होईल हे समजू शकेल.
ग्राहकांना काय फायदा?
कार खरेदी करताना सुरक्षा फिचर्स आणि रेटिंग पाहून निर्णय घेता येईल.
हिंदुस्थानातच चाचणी होणार असल्याने कंपन्या अधिक सुरक्षित वाहनांच्या निर्मितीवर भर देतील.

























































