
सामना प्रतिनिधी । माजलगाव
माजीमंत्री प्रकाश सोळंकेनी 15 वर्ष माजलगाव मतदारसंघावर आमदार म्हणून राज्य केले 12 वर्ष आमदार 3 वर्ष मंत्री असतानाही त्यांनी डांबराचे साधे टोपलेही टाकले नाही. त्यांना विकास कामांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा पलटवार एकेकाळी सोळंके यांचे कट्टर समर्थक व आता विरोधक असलेल्या माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी करून आमदार आर. टी. देशमुखांवर बोलण्याआधी प्रकाश सोळंकेनी त्यांच्या 15 वर्षांचा हिशोब जनतेला द्यावा असे सुनावल्याने आता राजकारण आणखी तापणार हे दिसून येत आहे.
माजी मंत्री प्रकाश सोळंकेंनी एका कार्यक्रमात पाझर तलावाचा उल्लेख करीत आमदार आर. टी. देशमुखांवर टीका केली होती. त्या टीकेला नाईकनवरे यांनी जोरदार पलटवार करून सोळंकेना आव्हान दिले की, सोळंकेंनी आमदार व मंत्री म्हणून काय कार्य केले? किती ठिकाणी नवीन रस्ते उभारले? सुंदरराव सोळंके टेक्सटाईल पार्कचे पुढे काय झाले? सादोळा उपसा सिंचन योजनेत कुणाचे हात ओले झाले? 15 वर्षांत किती ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प उभारले? याचा लेखाजोखा माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी जनतेसमोर ठेवावा. भाजपाच्या काळात सर्वांगीण विकास झाला असून मतदारसंघाच्या चारही दिशेला राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. प्रकाश सोळंके अजूनही पाझर तलावातच अडकले असून त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढून जलयुक्त शिवार योजनेतून मतदारसंघात बांधण्यात आलेली 600 बंधारे पहावेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निर्माण झालेले रस्ते पहावेत. वास्तविक पाहता चौफेर विकासाच्या कामाने आताच आगामी निवडणुकीत देशमुखांचा विजय सुनिश्चित झाल्यानें पराभवाच्या भीतीने प्रकाश सोळंकेची पाचावर धारण बसली आहे. सदैव गटबाजीत अडकलेल्या राष्ट्रवादीची जास्त काळजी करावी. राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याची व कार्यकर्त्याची ‘अडवून जिरवायची’ या त्यांच्या उदात्त ध्येयाकडे त्यांनी पहावे. जनतेला आधी काळ्याकुट्ट 15 वर्षाचा हिशोब द्यावा. जनताच देशमुखांच्या कामाची पावती गुलालाच्या रुपात निश्चित देईल, त्याची तुम्ही काळजी करू नका, असे नाईकनवरे यांनी पत्रकात म्हंटले आहे.
दरम्यान, या प्रत्युत्तरामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. नाईकनवरे यांनी दिलेल्या या आव्हानास सोळंके काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
































































