
जनता दल (युनायटेड) नेते नितीश कुमार यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांना विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदाचा चेहरा बनण्याची कोणतीही आकांक्षा नाही. महागठबंधनात सहभागी झाल्यानंतर आणि विक्रमी म्हणजेच आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नितीश कुमार यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे.
‘मी हे हात जोडून सांगतो, माझ्या मनात असा कोणताही विचार नाही…माझे काम सर्वांसाठी काम करणं आहे,’ असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. ‘सर्व विरोधी पक्ष एकत्र काम करतील यासाठी मी प्रयत्न करेन. त्यांनी तसे केले तर चांगले होईल.’
या आठवड्याच्या सुरुवातीला, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाची भाजपसोबतची युती संपवली आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर आरजेडी नेते तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात 10 लाख नोकऱ्या निर्माण करण्याच्या यादवांच्या आश्वासनावर ते काम करणार का, असे विचारले असता नितीश म्हणाले: ‘त्यांनी जे सांगितले ते बरोबर आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’
उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या Z+ सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल त्यांनी भाजपची निंदा केली. ‘त्यांनी त्यावर आक्षेप का घ्यावा? ते उपमुख्यमंत्री आहेत. तशी सुरक्षा त्यांना का मिळू नये? ते जे बोलत आहेत त्यात काही तथ्य नाही,’ असे त्यांनी एएनआयला सांगितले.
नितीश पुन्हा विरोधी पक्षाकडे वळल्याने, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी ते विरोधी पक्षांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नितीश कुमार आरजेडीसोबत सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्व विरोधी पक्षांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले.
‘2024 च्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष एकत्र राहू द्या. सर्व विरोधी पक्षांना पुढे यावे लागेल,’ असे म्हणतानाच त्यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याच्या चर्चांना नकारले आहे.





























































