
भाजपने अरुणाचलमध्ये मित्र पक्ष जदयूच्या सातपैकी सहा आमदारांना फोडून पक्षात प्रवेश दिला. सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजपकडून याचीच पुनरावृत्ती बिहारमध्येही घडून येण्याच्या धास्तीने मुख्यमंत्री नितीशकुमार चलबिचल झाले आहेत. त्यातच विरोधी पक्षात असणाऱ्य़ा राजदने नितीशकुमार यांना महागठबंधनमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी खुद्द लालू प्रसाद यादव कामाला लागले असून अरुणाचलमधील षटकारामुळे बिहारमध्ये भाजपची विकेट जाण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्य़ा भाजपने शब्द पाळत नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली खरी, मात्र कोणत्या ना कोणत्या कारणावरून भाजप आणि जदयूमध्य खेचाखेची सुरु आहे. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज आहेत. अरुणाचलमध्ये भाजपने दिलेल्या धोक्यामुळे तर त्यांची अस्वस्थता अधिकच वाढली आहे. त्यानंतर राजद नेत्यांनी मैत्रीचा हात पुढे करत बिहारमध्ये भाजपला धक्का देत सत्तांतर घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी नितीशकुमार यांना 2024 मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची खुली ऑफर दिली आहे.
नितीश कुमार यांना महागठबंधनमध्ये आणण्यासाठी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) काही नेते कामाला लागल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मदतदेखील यासाठी घेतली जाण्याची शक्यता आहे.
नितीश यांना महागठबंधनमध्ये सामील करून घेण्याबद्दल पक्षाचे नेते विचार करतील, असं स्पष्ट करत नव्या वर्षात बिहारमध्ये राजकीय भूकंप घडण्याचे संकेत राजद नेत्या आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी दिले आहेत.
नितीश यांना लक्ष्य करू नका; लालू प्रसाद
जदयूला सोबत घेऊन बिहारमध्ये सत्तांतर घडविण्यासाठी लालू प्रसाद यादव कामाला लागले आहेत. नितीशकुमार यांना लक्ष्य करू नका, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. अरुणाचलमध्ये भाजपनं केलेलं फोडाफोडीचं राजकारण ही राजदसाठी संधी असून ती गमावू नका, असा सल्लाही त्यांनी कुटुंबातील सदस्यांना दिला आहे.
जदयूमध्ये फूट पडण्याची भीती
भाजपकडून बिहारमध्ये सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणामुळे जदयूचे आमदार त्रस्त आहेत. भाजपाच्या कार्यशैलीमुळे नाराज असलेले 17 आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा राजद नेते श्याम रजक यांनी केला आहे. यामुळे जदयूमध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

























































