नितीश कुमार यांचा मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या हिंदुस्थानचे आता नवे पिता आले आहेत. या नव्या राष्ट्रपितांनी हिंदुस्थानसाठी काय केले? त्यांनी काही काम केलेय का? त्यांच्या काळात हिंदुस्थान कोणत्या क्षेत्रात पुढे गेलाय? असे प्रश्न करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या हिंदुस्थानचे नवे राष्ट्रपिता असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत नितीशकुमार यांनी संघ आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. भाजप आणि संघाने केवळ नव्या तंत्रज्ञानाचा जबरदस्तीने वापर केला आहे. आधी माध्यमं सरकार असो की विरोधी पक्ष, त्यांच्यावर आपली मतं अगदी स्पष्टपणे मांडायचे, मात्र आज माध्यमांना तेच लिहावे लागत आहे जे सांगितले जात आहे, असे ते म्हणाले.

नितीशकुमार म्हणाले, माझे वडील स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाले होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला, मात्र नंतर स्वातंत्र्यलढय़ाची प्रत्येक गोष्ट समजून घेतली. स्वातंत्र्यातील महात्मा गांधींचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही, मात्र आता काही लोक राष्ट्रपितांविषयी काय बोलत आहेत हे सर्व जण पाहत आहेत.

स्वातंत्र्यलढय़ात आरएसएसचे काही योगदान नाही
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही योगदान नव्हते. त्यांना या लढय़ाशी काहीही देणेघेणे नव्हते, मात्र आज हेच लोक स्वतःला सच्चे देशभक्त म्हणवून घेत असल्याची टीका नितीशकुमार यांनी केली.