
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ना. म. जोशी मार्ग बीडीडीतील 557 रहिवाशांचे अलिशान घराचे स्वप्न साकार होणार आहे. धनत्रयोदशीला म्हणजेच 6 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चावी वाटप सोहळा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ना. म. जोशी मार्ग येथील 32 चाळींमधील 2560 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 23 मजल्यांचे 14 टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. पुनर्विकासामुळे वर्षानुवर्षे 160 चौरस फुटांच्या घरात राहणाऱया रहिवाशांना 500 चौरस फुटांचे आलिशान घर मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील ‘ई’, ‘एफ’, ‘जी’ विंगमधील 557 घरांचे वितरण केले जाणार आहे. या इमारतींना ओसी मिळून दीड महिना झाला, मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने चावी वाटप सोहळा रखडला होता. गृहप्रवेशासाठी दसऱयाचा मुहूर्त हुकला. आता दिवाळीचा मुहूर्तदेखील हुकतोय की काय अशी शंका रहिवाशांच्या मनात होती. याबाबतचे वृत्त दै. ‘सामना’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चावी वाटप सोहळ्यासाठी वेळ दिली आहे.
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात.
































































