भाजपसोबत युती नाही; अण्णाद्रमुकच्या नेत्यानं केलं स्पष्ट

तमीळनाडूतील अण्णाद्रमुक (एआयएडीएमके) आणि भाजप यांच्यातील तणाव कमी होताना दिसत नाही. अण्णाद्रमुक पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की भाजपशी सध्या कोणतीही युती नाही आणि निवडणूकीसंदर्भात कोणताही निर्णय निवडणुकीदरम्यानच घेतला जाईल.

एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते डी जयकुमार यांनी द्रविडियन दिग्गज सी एन अन्नादुराई यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल भाजपचे राज्य प्रमुख के अन्नामलाई यांच्यावर टीका करताना, त्यांचे पक्ष कार्यकर्ते दिवंगत मुख्यमंत्र्यांचा कोणताही अपमान सहन करणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

अण्णामलाई यांनी दिवंगत जे जयललिता यांच्यासह अण्णाद्रमुकच्या नेत्यांबद्दल टीका केली होती, तेव्हा पक्षानं भाजप नेत्याला आवर घालण्याची मागणी केली होती.

‘भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी अन्नामलाई अण्णाद्रमुकशी युती करू इच्छित नाही. आम्ही आमच्या नेत्यांवरची ही सर्व टीका सहन करायची का? आम्ही तुमच्यासोबत का जाऊ? भाजप येथे पाय ठेवू शकत नाही’, असं म्हणत माजी मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना फटकारलं.

‘आम्ही यापुढे (नेत्यांची टीका) सहन करू शकत नाही. युतीचा प्रश्नच नाही. आमची. भाजपसोबत नाही. निवडणुकीच्या वेळीच काय ते ठरवता येईल. ही आमची भूमिका आहे’, असं ते म्हणाले.

हे त्यांचे वैयक्तिक मत आहे का, असं विचारले असता जयकुमार म्हणाले, ‘पक्ष जे ठरवेल तेच मी बोलतो’.