एआयच्या युगात कोणतीही नोकरी सुरक्षित नाही, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा इशारा

सध्या जगभरात एआयचा बोलबाला सुरू आहे. एआयमुळे नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असेही बोलले जात आहे. यावर बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. एआयच्या युगात कोणतीही नोकरी पूर्णपणे सुरक्षित नाही. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला नोकरीमधील मोठय़ा बदलासाठी तयार राहायला हवे, असा सल्ला त्यांनी कर्मचारी वर्गाला दिला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुंदर पिचाई म्हणाले की, मनुष्याने आतापर्यंत ज्या ज्या टेक्नोलॉजीवर काम केले आहे, त्यात एआय सर्वात सखोल तंत्रज्ञान आहे. एआयमधून असंख्य फायदे मिळण्याची शक्यता आहे. एआय नोकऱ्यांमध्ये काही बदल घडवून आणेल, यात शंका नाही. त्यामुळे लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवे. सध्या जगभरात असे काही क्षेत्र आहेत, जेथे एआयचा नोकऱ्यांवर परिणाम होईल. त्यामुळे आपण यावर चर्चा करायला हवी. आजचे सीईओ ज्या जबाबदाऱ्या सांभाळतात, त्या आगामी काळात एआय सिस्टमद्वारे आरामात पार पाडल्या जाऊ शकतील. हे सांगण्यामागचा उद्देश भीती पसरवणे नसून भविष्यात होणाऱ्या बदलांचे परिणाम अधोरेखित करणे आहे. एआय ज्या ज्या वेळी निर्णय घेण्यात आणि कार्य करण्यात सक्षम होईल, त्या त्या वेळी कामाचे स्वरूप विकसित होईल. लोकांना आता केवळ पारंपरिक पात्रतेवर अवलंबून राहता येणार नाही. त्यांना काळाशी अनुरूप राहण्यासाठी नवीन डिजिटल साधने वापरण्याची क्षमता विकसित करावी लागेल, असे सुंदर पिचाई म्हणाले.